काँग्रेस तालुकाध्यक्ष बदलाचा घाट

निरीक्षकांच्या उपस्थितीत आज बैठक
काँग्रेस तालुकाध्यक्ष बदलाचा घाट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी संघटनात्मक बदलाला प्रारंभ केला आहे...

एकीकडे प्रदेशाध्यक्ष असा निर्णय घेत असताना दुसरीकडे मात्र, नाशिक शहर (Nashik City) व जिल्हा (Nashik District ) नेतृत्व बदलाच्या तक्रारी असताना तालुकाध्यक्षच बदलाचा घाट घातला गेला आहे.

काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वाने मनमाड (Manmad), दिंडोरी (Dindori), सुरगाणा (Surgana), बागलाण (Baglan) व देवळा (Deola) तालुकाध्यक्षांना तात्काळ बदलण्याबाबतचे पत्र दिले असून या जागांवर काही नावांची शिफारस देखील करून टाकली आहे.

या पत्राची दखल घेत प्रदेश कॉंग्रेसने निरीक्षक पाठवून बैठक बोलाविली आहे. प्रदेश काँग्रेसच्या आदेशान्वये निरीक्षक विनायक देशमुख (Vinayak Deshmukh) यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.२०) कॉंग्रेस कमिटीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत खदखद उफाळून आली असून याबाबत दोन दिवसांपासून अंतर्गत चर्चेला उधाण आले आहे. अनेकांनी या बदलाला थेट विरोध केला असून स्थानिकांना विश्वासात न घेता थेट बदल करण्यासाठी बैठक बोलाविल्याने आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी खुली नाराजी व्यक्त केली आहे. याचे पडसाद मंगळवारच्या बैठकीत निश्चितच उमटणार असल्याचे सांगितले जात आहे.

बैठकीत निरीक्षक तालुकानिहाय आढावा घेणार असून पाच तालुकाध्यक्ष बदलांबाबत स्थानिकांची मते जाणून घेणार आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू असून निष्क्रीयांना घरचा रस्ता दाखविण्याचे धोरण प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी स्वीकारले आहे.

जिल्हा काँग्रेस नेतृत्व व शहर नेतृत्व बदलाबाबत अनेकदा पदाधिकाऱ्यांनी प्रदेश काँग्रेसकडे मागणी केली. मात्र, अद्यापही नेतृत्व बदलास मुहुर्त लागलेला नाही. दुसरीकडे मात्र, जिल्हा कॉंग्रेसने मनमाड, दिंडोरी, सुरगाणा, बागलाण व देवळा तालुकाध्यक्ष बदलण्यात यावे,असा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे पाठविला आहे. संभाव्य तालुकाध्यक्षांच्या नावाचीदेखील शिफारस केली आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या आदेशानुसार निरीक्षक देशमुख बैठक घेत आहे.

जिल्हाध्यक्षांवर नाराजी

बैठकीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा काँग्रेसअंतर्गत असलेली गटबाजी उफाळून आली आहे. जिल्हाध्यक्षांनी किती तालुक्यात जाऊन बैठका घेतल्या, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले का ?, त्या-त्या तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठांना विश्वासात न घेता थेट बदलाचा घाट कशासाठी असे प्रश्न पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

जिल्हाध्यक्षांना आपली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. पदाधिकाऱ्यांशी चर्चा, बैठक घेण्यासाठी त्यांना वेळ नसतो अशा निष्क्रीय जिल्हाध्यक्षांना तालुकाध्यक्षांना बदलण्याचा काय अधिकार आहे असा संतप्त सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत निरीक्षकांची भेट घेऊन विरोध करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com