मतदार यादीत घोळ; नागरिकांच्या हरकती

मतदार यादीत घोळ; नागरिकांच्या हरकती

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेची मुदत पुढील महिन्यात संपत आहेत. त्यामुळे पिंपळगाव बसवंत शहरात आगामी निवडणूक ग्रामपालिकेची होणार की नगरपरिषदेची ही संभ्रमावस्था कायम आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात प्रभागनिहाय यादीत मोठा घोळ असल्याचे दिसून आल्याने यावर नागरिकांनी हरकत घेतली आहे. तहसीलदार शरद घोरपडे यांच्याकडे शेवटच्या दिवशी लेखी हरकती नोंदवल्या आहेत.

पिंपळगाव बसवंतला काही दिवसांंपूर्वी प्रभागनिहाय रचना जाहीर झाली. ग्रामपालिकेच्या अंतिम आरक्षणावरदेखील शिक्कामोर्तब झाले. मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्या यादीत अनेक रहिवासी असलेल्या नागरिकांची वॉर्डनिहाय नावे बदलली गेली आहेत. 18 ऑक्टोंबर ही हरकती घेण्याची अखेरमुदत होती. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदार घोरपडे यांंच्याकडे लेखी हरकती नोंदवल्या आहेत.

शहरातील अनेक प्रभागातील मतदारांचे वॉर्ड उलटसुलट झाल्याने अनेकांनी या याद्यांबाबत आपला रोष व्यक्त केला आहे. निफाड तहसील कार्यालयाकडे नितीन बनकर, आशिष बागुल, अल्पेश पारख, किरण लभडे, विनायक खोडे, विशाल मोरे, हर्षल जाधव, दीपक विधाते, अंकुश वारडे, गिरीश बिडवई आदींसह चोवीस नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत.

तातडीने कार्यवाही होणार

निवडणूक आयोगाकडून आगामी पिंपळगाव ग्रामपालिका निवडणुकांसाठी राबवण्यात येणारी मतदार यादी प्रसिद्ध होताच अनेकांनी निफाड तहसील कार्यालयात हरकती नोंदवल्या. त्यानुसार पिंपळगाव बसवंतचे मंडळ अधिकारी, गाव कामगार तलाठी कार्यालयासह पिंपळगाव बसवंत ग्रामपालिका कर्मचार्‍यांच्या मदतीने प्राप्त झालेल्या हरकतींच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली. शुक्रवारी (दि.21) अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

प्रभागरचनेनुसार यादी हवी

वॉर्डरचना चुकीची झाली. नारायणटेंभी रोड आणि जलसा हॉटेल परिसरातील साधारणपणे दोन हजार मतदार वाढले होते. एक नंबर प्रभागातील भिडेनगरातील 70 टक्के मतदार पाच नंबरमध्ये स्थलांतर केले होते. एक नंबर प्रभागातील साधारत: दोन-अडीचशे मतदार प्रभाग दोनमध्ये टाकण्यात आले होते. तीन नंबर प्रभागात सहा नंबर प्रभागातील मतदार टाकण्यात आले होते. पूर्वीप्रमाणे असलेल्या प्रभागरचनेनुसार मतदार यादी पाहिजे.

किरण लभडे, ग्रा.पं. सदस्य (पिंपळगाव)

यादी दुरूस्त करा

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेने त्यानुसार प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. मात्र त्या याद्यांमध्ये मोठा घोळ होऊन मतदार राहत असलेले प्रभाग बाजूला आणि भलत्याच प्रभागात मतदारांची नावे सामविष्ट झाली. हा मोठा बदल मतदार याद्यांमध्ये झाल्याने संपूर्ण याद्याच बदलल्या गेल्या आहेत. प्रशासनाने हरकतींची दखल घऊन तत्काळ सुधारित मतदार याद्या दुरूस्त करून नागरिकांसाठी प्रसिद्ध कराव्यात.

अल्पेश पारख, ग्रा.पं. सदस्य (पिंपळगाव)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com