नियोजनाअभावी लसीकरण केंद्रावर गोंधळ

शहरात उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्याची मागणी
नियोजनाअभावी लसीकरण केंद्रावर गोंधळ

मनमाड । प्रतिनिधी Manmad

आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाच्या नियोजनाचे अभावामुळे मनमाडसह ( Manmad ) नांदगाव ( Nandgaon ) तालुक्यात लसीकरण केंद्रावर ( Corona Vaccination Center ) उडत असलेल्या गोंधळामुळे नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. जेंव्हा लसीचे डोस येतात तेंव्हा लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी उसळत असल्याने सुरक्षित अंतराचे नियमाकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

दरम्यान, शहराच्या एका टोकाला असलेले लसीकरण केंद्र गाठण्यासाठी नागरिकांना 50 ते 100 रुपयांचा भुर्दंड रिक्षासाठी करावा लागतो. मात्र लस उपलब्ध नसल्यास परत माघारी फिरावे लागते. नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरलेले हे लसीकरण केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.

आठवड्यानंतर मनमाडला 350 डोस उपलब्ध झाले होते, मात्र योग्य माहिती न मिळाल्याने लस घेण्यासाठी पहाटेपासून नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. लसीचे डोस कमी तर घेणारे जास्त त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला यात ज्येष्ठ नागरिकांनी मोठा त्रास सहन करावा लागला. टोकन देण्यात देखील अनागोंदी कारभार केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

करोनाला हद्दपार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण कसे करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र सरकारच्या या प्रयत्नाला एका प्रकारे खीळ बसविण्याचा प्रकार मनमाड शहरात घडत असल्याचे चित्र आहे. जेंव्हा जेंव्हा लसीचे डोस उपलब्ध होतात तेंव्हा तेंव्हा लसीकरण केंद्रावर नियोजनाचा अभाव असतो. किती डोस आले याची माहिती दिली जात नाही, त्यामुळे लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी उसळते.

दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 350 डोस उपलब्ध झाले होते मात्र नागरिकांना योग्य ती माहिती देण्यात आली नव्हती त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. काहींनी तर पहाटेपासून नंबर लावला होता. सकाळी 10 वाजेच्या सुमारास लस देण्यास सुरवात करण्यात आल्यानंतर लोकांनी एकच गर्दी केल्यामुळे अवघ्या काही मिनिटात लसीकरण बंद करण्यात आले.

लस कधी येणार आहे याची आगाऊ माहिती देण्यात येत नाही, शिवाय लस आल्यानंतर लसीकरण केंद्रावर जी व्यवस्था करायला पाहिजे ती केली जात नाही. प्रचंड गर्दी व गोंधळ झाल्यावर टोकन दिले जातात त्यात ही काही टोकन तर कर्मचारी आपापल्या ओळखीच्या लोकांना देतात असा गंभीर आरोप देखील नागरिकांनी केला आहे.

लसीकरण केंद्र शहराच्या एका टोकाला असल्यामुळे इतर भागातील नागरिकांना तेथे जाण्यासाठी सुमारे शंभर ते दीडशे रुपये खर्च लागतो. लसबाबत योग्य माहिती दिली जात नसल्याने नागरिकांना अनेक वेळा परत यावे लागते. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com