जि.प.सेवकांच्या बदल्यांबाबत संभ्रम

जि.प.सेवकांच्या बदल्यांबाबत संभ्रम

नाशिक । प्रतिनिधी

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यामध्ये रद्द करण्यात आलेल्या जिल्हा परिषद सेवकांच्या बदल्या कराव्या की नाही याबाबतचा संभ्रम अजूनही सुरूच आहे.

ग्रामीण भागातील वाढता करोनाचा प्रादुर्भाव तसेच सेवक बदल्यांमुळे आदिवासी व बिगर आदिवासी भागाचा समतोल बिघडला जाणार असल्याने बदल्या नकोच असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.बदल्या करण्याबाबत आग्रह झाल्यास आपसी, विनंती बदल्या कराव्यात ,असे सुचविण्यात आले आहे.

याबाबत प्रशासन नेमका काय निर्णय घेणार याकडे सेवकांचे लक्ष वेधले गेले आहे.करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य शासनाने सेवक बदली व भरती प्रक्रीया रद्द केली होती. मात्र, सरकारने जिल्हा परिषदेच्या सेवकांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले.

३१ जुलै अखेर बदली प्रक्रिया पूर्ण करावी,असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले. त्यानुसार जि.प. प्रशासनाने तयारी करत सेवा ज्येष्ठता यादी तयार करून ती २३ जुलैला प्रसिध्द करत आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविण्याची तयारी केली.

यातच या बदल्यांना १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ आली. प्रशासन तयारीत असताना बदल्या करू नये, अशा मागणीने जोर धरला.या पार्श्वभूमीवर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.४) विभागप्रमुखांची बैठक घेत, बदल्यांबाबतची भूमिका जाणून घेतली.

यात बहुतांश अधिकाऱ्यांना या परिस्थितीत बदल्या नको, अशी भूमिका मांडली. बैठकीस उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती संजय बनकर, मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्यकार्यकारी आनंद पिंगळे, रविंद्र परदेशी उपस्थित होते.

समतोल बिघडणार

बदल्यांमुळे आदिवासी व बिगर आदिवासी भागामधील समतोल बिघडला जाणार असल्याने रिक्त जागांची संख्या वाढणार असल्याचे सांगितले. काही सेवकांवर अन्याय होणार असल्याने त्यांच्या आपसी बदल्या कराव्यात. तसेच विनंती बदली प्रक्रीया राबवावी, असेही यावेळी सांगण्यात आले. याबाबत रिक्त जागांचा एकूण आढावा घेऊन प्रशासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com