नाशिक । प्रतिनिधी

दक्षिण गंगा अशी ओळख असलेल्या गोदावरी नदीपात्राचे तळ काँक्रीटीकरण काढण्याच्या कामाने वेग घेतला आहे. रामकुंड येथील हनुमान ते गाडगे महाराज पूल या पट्यातील अतिप्राचीन रामगया, पेशवे व खंडोबा कुंडतील काँक्रीटीकरण काढण्याचे काम मागील दोन दिवसांपासून जोरात सुरु अाहे. गोदाप्रेमींच्या लढयाला यश येत असल्याचे पहायला मिळते.

स्मार्ट सिटी अंतर्गत पावसाळा सुरु होण्यापुर्वी गोदानदीपात्रातील काॅक्रिटिकरण काढण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले होते. जून ते आॅगस्टची सुरवात या कालावधीत नदीपात्रातील अनामिक व दश्वामेध या दोन कुंडाचे काँक्रीटीकरण काढण्यात आले. त्यानंतर पावसामुळे नदी पात्राची पाणी पातळी वाढल्याने काम थांबविण्यात आले होते. .

तसेच धरणातुनही विसर्ग सुरु होता. त्यामुळे काम होऊ शकले नव्हते. आता पावसळा संपला असून धरणातुनही विसर्ग थांबविण्यात आला आहे. त्यामुळे गोदापात्र काॅक्रिटीकरण काढण्याचे काम पुन्हा एकदा सुरु झाले असून मागील दोन दिवसात जेसीबीद्वारे काँक्रीटीकरण काढले जात आहे.

एकूण पाच कुंड काॅक्रिटिकरण मुक्त करायचे आहे. त्यापैकी अनामिक व दश्वामेध हि कुंड पावसाळ्यापुर्वी काॅक्रिटिकरण मुक्त करण्यात आली. तर उर्वरीत तीन कुंडांचे काॅक्रिटिकरण काढले जात असून प्राचीन कुंड पुन्हा जिवंत केली जात आहे. त्यानंतर रामकुंड काॅक्रिटीकरण मुक्त केले जाणार आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या गॅजेटमध्ये या प्राचीन कुंडांबाबत नोंद केली आहे.

रामगया कुंड

या ठिकाणी प्रभु रामचंद्रानी त्यांचे वडील राजा दशरथ यांच्या अस्ती विसर्जित केल्या. त्यामुळे या कुंडाला रामगया कुंड हे नाव पडले.

पेशवे कुंड

पहिले बाजीराव पेशवे नाशिकला आले तेव्हा या कुंडाला पेशवे कुंड हे नाव देण्यात आले. या ठिकाणी पुर्वी वरुणा, सरस्वती, मेघा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा संगम व्हायचा.

खंडोबा कुंड

पानिपतच्या लढाईचे नायक सदाशिव भाऊ यांचे काका त्रंबक मामा पेठे यांनी बांधले. खंडोबा कुंड म्हणून ते अोळखले जाते.

दोन दिवसांपुर्वी स्मार्ट सिटी च्या अधिकार्यांची बैठक झाली. त्यानंतर नदी पात्रातील उर्वरीत तीन कुंडांचे काॅक्रिटिकरण काढण्याचे काम सुरु झाले आहे. जेसीबीच्या साह्याने काॅक्रिंट काढले जात असून मुळ कुंडाच्या रचनेला धोका होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

- देवांग जानी, गोदाप्रेमी