कामगार कृतज्ञता सप्ताहाची सांगता

नोंदणीसह उपक्रमांतून प्रबोधन
कामगार कृतज्ञता सप्ताहाची सांगता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विविध शासकीय योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळावा, यासाठी त्यांची नोंदणी आवश्यक असून या नोंदणीसाठी केडाई नाशिक मेट्रोतर्फे एक हेल्पलाईनची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली.

बांधकाम कामगार हा बांधकाम उद्योगाचा एक अविभाज्य घटक असून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा मंगळवारी समारोप करण्यात आला. त्याप्रसंगी पाटील बोलत होते.

या सप्ताहात कामगार नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण आणि समुपदेशन या गोष्टीसह विविध उपक्रम राबविण्यात आले. या सप्ताहात 300 कामगारांना प्रशिक्षण दिले. 50 जणांच्या रक्तदानातून रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले. 100 पुरुष व 25 महिला कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर आगामी वर्षात 3000 कामगारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

या सप्ताहात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे सचिव गौरव ठक्कर यांनी दिली. कामगारांचे मेसन, बार बेंडर, कारपेंटर या विविध ट्रेडमध्ये आरपीएल या प्रशिक्षणाअंतर्गत तीस जणांची बॅच सुरु करण्यात आली आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या कामगारांना प्रमाणपत्र दिले गेले. मजूर नोंदणीचे फायदे कामगारांना समजावून सांगण्यात आले.

सर्व कामगारांची आरोग्य तपासणी, दंत तसेच नेत्र तपासणी सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या सहकार्याने एमव्हीपी, एसएमबीटी, केबीएच तुलसीआय या हॉस्पिटल यांच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुषमा भुतडा यांनी बांधकाम कामगार महिलांची तपासणी करून सर्व कामगारांना मोफत औषधे पुरवण्यात आली.

या सप्ताहात झालेल्या मार्गदर्शनात क्रेडाई राष्ट्रीयचे घटना समितीचे प्रमुख जितूभाई ठक्कर यांनी कामगारांसाठी असलेल्या विविध प्रशिक्षणाची माहिती दिली तर माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी पंतप्रधान आवास योजना याची माहिती बांधकाम कामगारांना दिली तसेच कामगारांना हक्काचे घर मिळावे, यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रो शासनाकडे पाठपुरावा करून कामगारांना घरे कसे मिळवून देता येईल, याची माहिती घेऊ असे सांगितले.

क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल यांनी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या विविध 66 शहरात हा सप्ताह अत्यंत यशस्वीरित्या राबविला गेला असल्याचे नमूद केले.

सहसचिव नरेंद्र कुलकर्णी व सहसचिव अनिल आहेर यांनी सर्व कार्यक्रमांची नियोजन केले. कमिटी सदस्य सतीश मोरे, विजय चव्हाणके, ऋषिकेश कोते, मनोज खिवसरा, सचिन बागड, अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सागर शहा, सुशील बागड, हंसराज देशमुख व सर्व कमिटी सदस्य यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com