बायोमेट्रिकची सक्ती म्हणजे करोनाला आमंत्रण

बायोमेट्रिकची सक्ती म्हणजे करोनाला आमंत्रण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कार्यालयीन वेळ सेवकांकडून पाळली जात नसल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नववर्षाच्या प्रारंभीच सोमवार (दि.३) पासून जिल्हा परिषद (Zilla Parishad) सेवकांची हजेरी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे (Biometric system) नोंदविण्यास सुरुवात झाली...

मात्र मुख्यालयात एकच प्रणाली कार्यान्वित झाल्याने मंगळवारी (दि.४) सलग दुसऱ्या दिवशी सेवकांची येताना व जाताना एकच गर्दी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या बायोमेट्रिक प्रणालीची सेवकांना प्रतीक्षा आहे.

दरम्यान, विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच अशा पध्दतीने हजेरी म्हणजे करोनाला (Corona) आमंत्रणच अशी भीती सेवकांमधून व्यक्त केली जात आहे. करोना संकटात अशा पध्दतीने हजेरीचा अट्टाहास नेमका कशासाठी? असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.

कार्यालयात येण्याजाण्याची वेळ ठरलेली असली तरी बहुतांश सेवक वेळेचे बंधन कधीच पाळत नसल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेत बायोमॅट्रिक थंब यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या यंत्रणेवर बोट टेकवूनच हजेरी लावली जात. मुख्य इमारतीच्या आवारात दोन ठिकाणी ही यंत्रणा यापूर्वीही बसविण्यात आलेली आहे. करोनाचा प्रादुर्भाव जाणवण्याआधी अशाच पध्दतीने सेवकांची हजेरी लागत असे. त्या आधारेच वेतनही काढले जात असे. मात्र, या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव जाणवायला सुरूवात झाल्यानंतर सरकारने विविध प्रकारचे निर्बंध लादले. त्यात या यंत्रणेद्वारे हजेरी लावण्यातूनही सूट देण्यात आली. एकाच यंत्रावर अनेक सेवकांची बोटे लागत असल्याने आजाराचा फैलाव होण्याची भीती होती.

हा फैलाव रोखण्यासाठीच दरम्यानच्या काळात या यंत्राचा वापर करणे टाळण्यात आले. मात्र नवीन वर्षांचा मुहूर्त साधून पुन्हा या यंत्रणाद्वारेच हजेरी लावण्याची पध्दत सुरू झाली आहे. पूर्वी दोन यंत्र असली तरी सध्या मात्र एकच यंत्र आहे. पूर्वीची दोन यंत्रे खराब झाली होती. त्यामुळे तीन नवीन यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यापैकी तूर्त तरी एकच यंत्र खरेदी करण्यात आले आहे. सोमवारी, मंगळवारी सकाळी धावपळ करून कार्यालयात पोहचलेल्या सेवकांची यंत्रावर अंगठा टेकून हजेरी लावण्यासाठी आटापिटा केला.

एकच यंत्र असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली होती. ही गर्दीच मुळी करोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते, असे चित्र यावेळी दिसून आले. यंत्र एकच असल्याचे त्यावर अनेक जणांचे बोट टेकविले गेले. ही बाबही संसर्ग वाढविण्यास पूरक ठरू शकते, असे सेवकांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com