जुने नाशकात पूर्णपणे लॉकडाऊन
नाशिक

जुने नाशकात पूर्णपणे लॉकडाऊन

मेनरोडसह इतर भाग सुरळीत सुरू

Abhay Puntambekar

जुने नाशिक । प्रतिनिधी Nashik

पोलिसांनी पुढाकार घेऊन जुने नाशिक परिसरातील सर्व दुकाने देखील बंद केल्याने आता या ठिकाणी पुढील काही दिवस कडक लॉकडाऊन राहणार आहे. मात्र मेन रोड, शालिमारसह येथील सर्व प्रकारचे भाग चालू असल्यामुळे जुने नाशिकच का बंद केले, सर्वत्र रुग्ण असल्याने संपूर्ण शहर का सील करण्यात आले नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.

मागील सुमारे दोन महिन्यात जुने नाशिकच्या काही भागातून मोठ्या संख्येने करोना रुग्ण मिळाले होते, अनेक जण दगावले. यामुळे ठिकठिकाणी महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून परिसर घोषित केले होते. मात्र रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्यामुळे सात जुलै रोजी महापालिका आयुक्त राधाकृष्ण यांनी विशेष आदेश काढून संपूर्ण जुने नाशिक परिसरात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले.

यामुळे येथील जुने नाशिकमध्ये प्रवेश करणारे जवळपास सर्व मार्ग प्रशासनाने लोखंडी जाळ्या व बांबू लावून सील केले होते. फक्त मार्ग बंद करून विशेष उपयोग न झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून पोलिसांनी परिसरात जनजागृती करून आज गुरुवारपासून संपूर्ण जुने नाशिक कडक लॉकडाऊन राहणार असल्याचे सांगितले. यामुळे संपूर्ण जुने नाशिक आता सील झाले आहे.

मात्र भद्रकाली बाजार भागातील मेनरोड, दही पूल, चौक वंदेमातरम चौक, शालिमार, ठाकरे रोड आदी भागात दुकाने सुरळीत सुरू आहे. विशेष म्हणजे ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी देखील होत आहे. तर दुसरीकडे वडाळा नाका, द्वारका, टाकळी फाटा, टाकळीरोड, मुंबई नाका, वडाळारोड, पखालरोड, विनयनगर, भारतनगर, वडाळा गावपर्यंत संपूर्ण परिसर खुला आहे.

प्रशासनाने रुग्ण संख्येला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले असेल तर संपूर्ण ठिकाणी रुग्ण मिळाले आहेत या संपूर्ण भागात महापालिका प्रशासन व पोलिसांनी सील करण्याची मागणी जुने नाशिककरांनी केली आहे. दरम्यान जुने नाशिक कडक लॉकडाऊन झाल्यानंतर मध्य नाशिकचे आ. देवयानी फरांदे यांनी परिसरात पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधिकारी देखील त्यांच्यासोबत होते.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

पोलिसांच्या पुढाकाराने आजपासून जुने नाशिक परिसर कडक लॉक डाऊन करण्यात आले. येथील मार्ग लोखंडी जाळ्या तसेच बांबूने बंद करण्यात आले आहे. तर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्तदेखील लावण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com