दहीपुल
दहीपुल
नाशिक

फुलबाजारातील काम लवकर पुर्ण करा

व्यावसायिकांच्या अपेक्षा, आंदोलन

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

दहीपुल, सराफ बाजारात पावसाच्या साठणार्‍या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्मार्टसिटी अंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामास काही नागरीकांचा तसेच पदाधिकार्‍यांचा विरोध झाल्याने हे काम अद्याप सुरूच झालेले नाही. यासाठी या भागातील व्यापार्‍यांनी शनिवारी एकत्र येत आंदोलन केले. यापुर्वीचा स्मार्टसीटी कामाचा अनुभव पाहता हे काम तातडीने सुरू करून लवकरात लवकर पुर्ण करावे अशा अपेक्षा येथील व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत.

शहरात जोराचा पाऊस होताच सराफ बाजार, दहीपुल, कानडेमारूती लेन या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून हे पाणी दुकानांमध्ये शिरते, याच्या परिणामी प्रत्येक मोठ्या पावसात येथील व्यापार्‍यांचे नुकसान होते. येथील सखल भागातील पाणी लगेच निघुन जावे यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी होत होती.

त्यानुसार पालकमंत्री छगन भुजबळ, महापौर सतिश कुलकर्णी यांनी पाहणी केल्यानंतर स्मार्टसीटी अंतर्गत धुमाळ पॉइंट ते सत गाडगेमहाराज पुल या भागात रस्ताचालून मोठी ड्रनेजलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यासाठी वाहतुक बदलाच्या अधीसुचना देण्यात आली होती. तसेच 4 दिवसांपुर्वीच खोदकामासाठी जेसीबी तसेच इतर यंत्रणाही आली आहे. मात्र हे काम अद्याप सुरू झालेले नाही.

त्र्यंबकनाका ते अशोक स्तंभ या रोडचे स्मार्टसीटी अंतर्गत करण्यात आलेल्या कामास दिड वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला होता. यामुळे येथील व्यापारी रडकुंडी आले होेते. तसाच प्रकार या ठिकाणी होऊ नये, तसेच झाल्यास या भागातील अरूंद रस्ते, गल्ली बोळीतून वळवण्यात आलेली वाहतुक, मुख्य बाजारपेठेचा भाग असल्याने होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर मोठा गोंधळ उडण्याची भिती व्यक्त होत आहे. काही स्थानिक नागरीक व काही पदाधिकार्‍यांनी यास विरोध केल्याने काम अद्याप सुरूच झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

या कामास व्यापार्‍यांनी विरोध केलेला नाही. कोणीती दिशाभूल करत असल्याचे आरोप व्यापर्‍यांनी केले आहेत. उलट हे काम तातडीने सुरू करून ते फक्त लवकरात लवकर पुर्ण करावे अशाच अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत.

काम सुरू करावे

पुर्ण तयारी झाली असताना रस्त्याचे काम बंद का पडले हे समजले नाही. गेली चार पिढ्या आम्ही पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करत आहोत. आमची सर्व व्यापर्‍यांची काम सुरू करावे अशीच मागणी आहे.

वेळेत काम पुर्ण व्हावे

दहीपुल परिसरात दरवर्षी पावासचे घाण पाणी व्यावसायिकांच्या दुकानात घुसते. होणारे नुकसान वाढत आहे. ही मुख्य बाजारपेठ आहे. सणावाराला येथे कायम गर्दी असते. यामुळे हे काम लवकर सुरू करून लवकर संपवावे. पुढे सण आहेत.

- कमलेश पारख, व्यापारी

जनजीवन प्रभावीत

हा मुख्य बाजार पेठेचा भाग आहे. मुळात अरूंद रस्ते असल्याने या भागात कायम गर्दी असते. या कामामुळे सर्वांचे जनजीवन प्रभावीत होणार आहे. येथील काम रखडण्याचा प्रकार झाल्यास येथील व्यावसायिक , रिक्षा चालकांनाही उपाशी राहावे लागले

- अनिल पंडित गोरे, रिक्षा चालक

तर व्यावसायीक संपेल

अगोदरच लॉकडाऊनने व्यापार्‍यांचे नुकसान सुरू आहे. आता समविषमने एक दिवस दुकाने बंद असतात. तर त्र्यंबकनाका - अशोकस्तभ स्मार्टसीटी रोडच्या कामाचा अनुभव भयानक आहे. असा प्रकार झाल्यास व्यापारी भिकेला लागेल. हे काम लवकर सुरू करून वेळेत पुर्ण करावे

- दिपक पगार, व्यावसायिक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com