मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरातील रस्ते दुरुस्ती व स्वच्छतेची कामे येत्या 15 दिवसात पूर्ण करावीत तसेच विकास कामे दर्जेदार होण्याच्या दृष्टिकोनातून अधिकार्यांनी लक्ष घालावे. बंद पथदीप दहा दिवसात सुरू झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश देत कृषीमंत्री दादा भुसे यांनी शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देतांना हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे निर्देश दिले.

मनपाच्या प्रभाग 1 च्या कार्यालयात रस्ते, आरोग्य, स्वच्छता, वीज, पाणीपुरवठा आदी कामकाजाचा आढावा कृषिमंत्री भुसे बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त त्र्यंबक कासार, उपमहापौर निलेश आहेर, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, प्रभाग सभापती कल्पना वाघ, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, प्रभाग अधिकारी हरीश डिंबर, शहर अभियंता कैलास बच्छाव, सहाय्यक आयुक्त राजू खैरनार आदी उपस्थित होते.

या बैठकीत शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी प्रभाग 1 मधील रस्त्यांचा विकास, भुयारी गटारी, मनपातर्फे प्रभागात सुरु असलेल्या विविध विकास कामांबाबत माहिती दिली. मात्र बैठकीला उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी सुरु असलेल्या विकास कामांबद्दल असमाधान व्यक्त करत कृषीमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेकडून प्रभागात पुरेसा विकास निधी मिळत नसल्याचेही नगरसेवकांनी सांगितले.

रस्ते दुरुस्ती व स्वच्छता संदर्भात येत्या पंधरा दिवसात निर्णय घेण्यात यावा, तसेच आग्रारोड, कॅम्परोड, सटाणारोड, स्वच्छ करणे व काटेरी झुडपे काढण्यासाठी मदत लागल्यास दोन जेसीबी उपलब्ध करुन देण्यात यावे, तसेच बंद अवस्थेतील पथदिवे हे येत्या दहा दिवसात दुरुस्तीचे कामे करुन पथदिवे चालू करण्याचे आदेश भुसे यांनी दिले. महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणारे विकासकामे ही दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकार्यांना ना. भुसे यांनी यावेळी दिले.

आरोग्य अधिकारी डॉ.सपना ठाकरे यांनी 16 जानेवारीपासून सुरु करण्यात आलेल्या कोविड-19 लसीकरणाबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली तर लसीकरणानंतरही आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले. बैठकीस सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, संजय जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख विनोद वाघ, नगरसेवक दिलीप बच्छाव, राजेश गंगावणे, पप्पू पवार, किशोर बच्छाव, प्रकाश आबा अहिरे, राजेंद्र शेलार, भरत बागुल, सुनील काळे, विजय देवरे, दिनेश साबणे, पुष्पा गंगावणे, अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.