नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषद सदस्यांना हक्काचा समजला जाणार्या सेस निधीचे वाटप करण्याचा अधिकार अध्यक्षांना देण्यावरून सर्वसाधारण सभेत, सदस्यांनी परस्परविरोधी मते मांडल्याने मतभेद झाले. सभेत महिला सदस्या आपले मत मांडत असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत सभा रेटण्याचा प्रयत्न करण्यात आला.असा आरोप होत आहे.

अर्थसंकल्पीय सभेत सचिवांनी महिला सदस्यांना डावलत चुकीच्या पध्दतीने कामकाज केल्याचा आरोप महिला सदस्यांनी केला असून या विरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे.

जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत सदस्यांचा डोळा असलेल्या सेस निधीचे समान वाटप करण्याबाबत एका सदस्याने भूमिका मांडली असता महिला सदस्याने विरोध करत निधीचे समान वाटप करण्यात येऊन त्याचे वाटप मुख्य लेखा व वित्त अधिकार्यांनी करावे, अशी भूमिका मांडली.

त्यांच्या भूमिकेला इतर महिला सदस्यांनी पाठिंबा दर्शवित गतवर्षी सेस निधीचे असमान वाटप झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. त्याचवेळी एका महिला सदस्या ही भूमिका सातत्याने मांडत असतानाही सचिवांनी पुढील विषयांचे वाचन करत सभेचे कामकाज सुरू ठेवले. अध्यक्ष असताना सदस्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांना त्यांचे बोलणे मांडून न देण्याच्या त्यांच्या या वागण्यामुळे महिला सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा जि.प.वर्तुळात आहे.

महिला सदस्यांच्या रेट्यामुळे अखेर अध्यक्षांनी तुमच्या म्हणण्याची नोंद घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर तो विषय संपला असला तरी सचिवांनी चुकीच्या पध्दतीने कामकाज चालवल्याची भावना या महिला सदस्यांची झाल्याने या नाराज महिलांनी सचिवांच्या भूमिकेबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्याचे समजते. सभेत ठराविक सदस्यांना बोलू दिले जाते, या ठराविक सदस्यांना विचारात घेऊनच कामकाज केले जाते.अशी बहुतांश महिला सदस्यांनी तक्रार केली असल्याचे सांगितले जात आहे.