इंदिरानगर । वार्ताहर Indira Nagar

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील पाच महिन्यांपासून शाळा बंद असतानाही शुल्कवाढ केली.

वसुलीसाठी पालकांवर दबाव टाकणार्या विज्डम हाय इंटरनॅशनल स्कूलवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना विभागप्रमुख निलेश साळुंखे व पालकांच्या वतीने करण्यात आली असून याबाबत शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले.

कोविड-19 संकटामुळे आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे शाळेची फी भरण्यास पालक असमर्थ आहेत. तरीही शाळा प्रशासन व संस्था संचालकांनी पालकांवर नियमबाह्यपणे फी भरण्यास दबाव आणत आहेत. सध्या पालकांची बिकट आर्थिक परिस्थिती पाहता या बाबी पालकांनी शाळा प्रशासन व संस्था चालकांसमोर मांडल्या.

परंतु शाळा व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणामुळे कोणतीही तडजोड करण्यास शाळा प्रशासन व संस्थाचालक तयार नाही. तसेच पालकांना मामुली सवलत दाखवून तत्काळ फी भरण्यासाठी तगादा लावत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

संबंधित शाळांवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शाळेच्या विरोधात आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे विभागप्रमुख व नाशिक पालक संघटनेचे अध्यक्ष निलेश साळुंखे यांनी निवेदनाद्वारे दिला. यावेळी प्रदीप यादव, सुषमा गोराने आदींसह पालक उपस्थित होते.