संगमनेर । प्रतिनिधी

उपसरपंचाने ग्रामसेवकाला हाताशी धरुन आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दोघांनी मिळून तब्बल 106 वेळा स्वतःच्या नावाने धनादेश काढून शासनाच्या विविध योजनांतील 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा अपहार केला आहे. पंचायत समितीच्या अधिकार्यांनी संबंधितांवर फसवणूकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार सारोळे पठार येथील एका इसमाने 25 जानेवारी 2021 रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांकडे सारोळे पठार ग्रामपंचायतीमध्ये शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार करुन चौकशीची मागणी केली. त्यानुसार गटविकास अधिकार्यांनी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करुन 10 फेब्रुवारी 2021 रोजी चौकशीचे आदेश दिले.

त्यानुसार समितीने करुन सन 2012-13 ते 2017-18 या कालावधीत सारोळे पठारचे तत्कालीन सरपंच प्रशांत गवराम फटांगरे व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार, अनियमितता व अपहार झाल्याचा अहवाल 31 जुलै 2020 रोजी गटविकास अधिकार्यांना सोपविला.

यानंतर या दोघांनाही वेळोवेळी नोटीसा बजावून आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले. सरपंच फटांगरे यांनी यासर्व नोटीसांना केराची टोपली दाखवली, मात्र ग्रामसेवक शेळके यांनी 1 ऑक्टोबररोजी आपले म्हणणे सादर केले. त्याची पडताळणी करुन 10 नोव्हेंबररोजी अंतिम अहवाल सादर करण्यात आला.

दोघांनीही संगनमताने वरील कालावधीत सरपंच प्रशांत गवराम फटांगरे यांनी 11 लाख 72 हजार 155 रुपयांचा धनादेश स्वतःच्या नावाने काढले आणि संयुक्त जबाबदारी असलेल्या एकूण रकमेच्या (8 लाख 83 हजार 131 रुपये) 50 टक्के रक्कम 4 लाख 41 हजार 565 रुपये असे मिळून एकूण 16 लाख 13 हजार 720 रुपयांचा सरपंच फटांगरे यांनी अपहार केला.

सरपंच प्रशांत फटांगरे यांनी तब्बल 82 वेळा तर ग्रामसेवक शेळके यांनी 24 वेळा स्वतःच्या नावाने धनादेश काढून सारोळे पठार गावाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेला 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा गैरव्यवहार केला. त्यानुसार पोलिसांनी या दोघांविरोधात भा.द.वी.कलम 420, 409, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने संपूर्ण ग्रामपंचायतींध्ये खळबळ उडाली आहे.