शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी : आ. दिलीप बोरसे

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी : आ. दिलीप बोरसे

सटाणा । प्रतिनिधी Satana

.ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, शेवगा पिकांसह रब्बी पिकांची अतोनात हानी झाली आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना भरपाई देत दिलासा द्यावा, अशी मागणी आ. दिलीप बोरसे यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना निवेदन देत केली आहे.

बागलाण तालुक्यात सद्यस्थितीत ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस झाल्यामुळे लाखो रुपये खर्च करून सुमारे 800 हेक्टर क्षेत्रावरील घेतलेले द्राक्ष पिक पूर्णपणे बाधित होऊन वाया गेले आहे. यामुळे अर्ली द्राक्ष पीक घेणार्‍या परिसरात यंदाचा हंगामच वाया जाऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या या लहरीपणामुळे हिराहून नेला. तीच परिस्थिती कांदा उत्पादक शेतकर्‍यांची आहे.

महागडे बियाणे खरेदी करून कांद्याचे रोपे तयार केली. एकरी हजारो रुपये खर्च लागवड केली. मात्र या अवकाळी पावसाने काबाड कष्ट करणार्‍या बळीराजाचे स्वप्न धुळीस मिळाले. या सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकावर करपा पडून पिक बाधित झाले आहे. तसेच बहुतांश शेवगा पीक, रब्बी हंगामातील हरभरा, गहु पिकाचे देखील बाधित झाल्या आहेत. या अस्मानी संकटामुळे बळीराजाचे पूर्णपणे कंबरडें मोडले असून, बाधित पिकांचा पंचनामा करून भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी आ. बोरसे यांनी केली आहे.

याबाबत भुसे यांनी दखल घेत बाधित पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश यंत्रणेला दिले. नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर भरपाईसाठी शासनाकडे सादर करण्यात येईल, असे आश्वासन देखील भुसे यांनी आ. बोरसे यांना दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com