बकरी ईदनिमित आज सामुदायिक नमाज पठण

सण शांततेत साजरा करा; उलेमांचे आवाहन
बकरी ईदनिमित आज सामुदायिक नमाज पठण

जुने नाशिक । प्रतिनिधी Nashik

ईद-उल-अज्हा अर्थात बकरी ईदचा मोठा सण शहर परिसरातील मुस्लिम बांधव आज (दि.29) साजरा करणार आहे. यानिमित्त सकाळी 9. 45 वाजता शहरातील ऐतिहासिक शहाजानी ईदगाह मैदानावर खतीब ए नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली ईदची विशेष सामुदायिक नमाज पठण करण्यात येणार आहे. दरम्यान ईद तसेच आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने दोन्ही समाजात आनंदाचे वातावरण आहे. मुस्लिम बांधवांनी अनेक ठिकाणी उद्या कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून शहरातील काही मार्गात पोलिसांनी बदल केले आहेत.

ईदनिमित्त महात्मा फुले मार्केटजवळील मौला बाबा तालीमीजवळ भरलेल्या तात्पुरते बोकड बाजारात मोठ्या प्रमाणात बोकडांची विक्री झाली. दरम्यान ईदचा सण शहर परिसरातील मुस्लिम बांधवांनी धार्मिक पद्धतीने व शांततेत साजरा करावा, ईदगाह मैदानात होणार्‍या सामुदायिक नमाज पठण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, शासनाने ठरवून दिलेल्या जनावरांची कुर्बानी करावी, कुर्बानी करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी. शहरातील शांतता, सुव्यवस्था व जातीय सलोखा कायम राखावा, असे आवाहन खतीबे शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी व उलेमांनी केले आहे.

ईदनिमित्त शहरातील उर्दू माध्यमाच्या शाळांना सलग चार दिवस सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ईदच्या पूर्वसंध्येस आज सायंकाळी मगरीब नमाजानंतर अरफाचा सण साजरा होणार आहे. यानिमित्त अनेक घरांमध्ये प्रसाद तयार करून फातेहा पठण करणार आले.

ईद निमित इदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी मुस्लीमबांधवांची मोठी गर्दी होते. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी यासंदर्भातील अधिसूचना काढली आहे. दि.29 रोजी बकरी ईद असल्याने इदगाह मैदानावर मुस्लीमबांधव नमाज पठण करण्यासाठी एकत्र येतात. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. त्र्यंबक पोलिस चौकी ते मायको सर्कलपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी जाण्या-येण्यास बंद करण्यात येणार आहे.

याबरोबरच गडकरी चौक ते मोडक सिग्नलपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंद राहणार आहे. मोडक सिग्नलपासून त्र्यंबक रस्त्याने जाणारी वाहतूक सीबीएस, अशोकस्तंभ, गंगापूरनाका सिग्नल ते जुना सिटीबी सिग्नलमार्गे जातील किंवा मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, संदीप हॉटेल, चांडक सर्कल मायको सर्कलमार्गे जुना सिटीबी सिग्नलमार्गे त्र्यंबककडे जातील. मायको सर्कलकडून मोडक सिग्नलकडे येणारी वाहतूक ही मायको सर्कलकडून चांडक सर्कल, संदीप हॉटेल, गडकरी चौकमार्गे इतरत्र जातील किंवा जुना सिटीबी सिग्नल, एचडीएसी सर्कल, कॅनडा कॉर्नर, गंगापूर रोडमार्गे जातील.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com