कौशल्य अभ्यासक्रम निश्चितीसाठी समिती; दाेन महिन्यात सादर करावा लागणार अहवाल

कौशल्य अभ्यासक्रम निश्चितीसाठी समिती; दाेन महिन्यात सादर करावा लागणार अहवाल

नाशिक | Nashik (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातंर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विविध अभ्यासक्रमांची आखणी सध्या सुरू आहे.

मात्र, ही आखणी होत असताना विद्यापीठातून विविध कौशल्य आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

राज्यातील युवक-युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कौशल्यावर आधारित उच्च शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करून, त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ’ स्थापन करण्यात येत आहे.

या संदर्भात ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम २०२१’ २३ मार्च २०२१ रोजी राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. विद्यापीठाचा प्रथम परिनियमांचा आणि अध्यादेशांचा मसुदा तयार करण्यासाठी आणि विद्यापीठांतर्गत सुरू करावयाचे कौशल्य अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी राज्य सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने तज्ज्ञ समिती नेमली आहे.

पुण्यातील सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत आठ सदस्यांचा समावेश आहे. तसेच समितीच्या अध्यक्षांना आवश्यकतेनुसार तज्ज्ञांना आमंत्रित करण्याचे अधिकार राहणार आहेत. समितीला अभ्यासक्रमाबाबतचा अहवाल दोन महिन्यांत सादर करावा लागणार आहे.

समिती सदस्य

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, डॉ. राजेंद्र वेळूकर, आयआयटी (मुंबई) प्राध्यापक कवी आर्या, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. एम. साळुंखे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, हेल्थकेअर तज्ज्ञ समीर जोशी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सह सचिव डॉ. सुवर्णा खरात यांचा समावेश आहे.

अशी होईल अभ्यासक्रम निश्चिती :

- बारावीनंतरचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

- उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन, विभागवार कौशल्य विकसित होण्यावर भर

- केवळ पदवी नव्हे तर ‘प्रोफेशनल’ पदवी देणारे हे विद्यापीठ असेल

- आयटी, फूड प्रोसेसिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल, सायबर सिक्युरिटी, टेक्नॉलॉजी, अशी नवीन कौशल्ये देण्यावर भर

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com