'स्मार्ट' योजनेंतर्गत कांदा निर्यातीस प्रारंभ
नाशिक

'स्मार्ट' योजनेंतर्गत कांदा निर्यातीस प्रारंभ

पहिला कंटेनर रवाना

Abhay Puntambekar

देवळा । प्रतिनिधी

जागतिक बँक अर्थसहाय्यीत स्व.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) योजनेंतर्गत देवळा अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीची निवड करण्यात आली असून कंपनीमार्फत देश-विदेशात कांदा निर्यात सुरू करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली.

स्मार्टमार्फत निवड करण्यात आलेली देवळा अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी ही नाशिक जिल्ह्यातील एकमेव शेतकरी कंपनी आहे. या कंपनीमार्फत शेतकर्‍यांचा शेतातील माल थेट ग्राहकांच्या दारात नेण्यासाठी कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस व त्या अनुषंगिक सोयी-सुविधांसाठी दीड कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आहेर यांनी दिली.

स्मार्टच्या योजनेंतर्गत देश-विदेशात भाजीपाला पुरवठा करणार्‍या ‘गो फॉर फ्रेश’ या कंपनीबरोबर देवळा अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीचा शासनस्तरावर करार झाला आहे. त्या अनुषंगाने सध्या शेतकर्‍यांच्या शेतातील कांदा परराज्यासह परदेशातही विक्री करण्यास सुरुवात झाली आहे.

या निर्यातीतील पहिला कंटेनर आत्माचे प्रकल्प संचालक हेमंत काळे यांच्या हस्ते रवाना करण्यात आला. यावेळी कंपनीचे संचालक प्रविण मेधने, शुभम निकम, गो फॉर फ्रेशचे पदाधिकारी प्रवीण निकम, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर खैरनार, महेश देवरे, किशोर अहिरे आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com