नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून शहरात राबविल्या जाणार्या रेशनकार्ड शिबीरास पंचवटी मधील गणेश वाडी येथे सुरवात झाली असून युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पंचवटी मधील गणेश वाडी परिसरातील मा.छगनरावजी भुजबळ नागरी सहकारी पतसंस्था येथे रेशनकार्ड शिबिर सुरु करण्यात आले असून यामार्फत रेशनकार्ड संदर्भातील अडचणी सोडविण्यात येणार आहे.

नाशिक शहरातील अनेक नागरिकांना रेशनकार्ड संदर्भात समस्या असून त्या तातडीने सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 1 ते 28 फेब्रुवारी पर्यंत विशेष अभियान राबवून नाशिक शहरात रेशनकार्ड शिबीर आयोजित केले आहे. अनेकदा रेशनकार्ड संदर्भात नागरिकांना रेशनकार्ड कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. कागदपत्रांची पूर्तता नसल्याने व अपुरी माहितीमुळे अनेक कुटुंबाचे रेशनकार्ड दुरुस्त होत नाही.

या शिबिरात फाटलेले रेशनकार्ड नवीन करणे, पत्ता बदल करणे, हरवलेले रेशनकार्ड नवीन करणे, रेशनकार्ड विभक्त करणे, रेशनकार्ड मध्ये नाव वाढविणे, कमी करणे आदि कामे होणार असून याकरिता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. रेशनकार्ड संदर्भातील अडचणी करिता नागरिकांनी मा.छगनरावजी भुजबळ नागरी सहकारी पतसंस्था, गणेश वाडी येथे संपर्क करावा असे आवाहन युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केले आहे.

यावेळी संदीप गांगुर्डे , संदीप खैरे , हरिभाऊ वेलजाळे, शांताराम क्षिरसागर , रघुनाथ गावित , रणजित दुबेर , सागर बेदरकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.