नाशिक-पुणे रेल्वे मार्ग सर्वेक्षणाला प्रारंभ

शेतकरी हिताचा मार्ग निवडणार : खा. गोडसे
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग सर्वेक्षणाला प्रारंभ

देवळाली कॅम्प । वार्ताहर

बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला अखेर नानेगाव येथे श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे नाशिकच्या विकासाला गती मिळणार असली तरी शेतकरी हिताचाच मार्ग निवडला जाणार असल्याचे खा. हेमंत गोडसे यांनी सांगितले.

नाशिक, पुणे, मुंबई येथील व्यावसायिक व नागरिकांनी रेल्वेचा सुवर्ण त्रिकोण साधण्यासाठी वेळोवेळी खा. गोडसेंकडे मागणी केली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून खा. गोडसे यासाठी प्रयत्नशील होते. ही मागणी अतिशय योग्य असल्याने केंद्र व राज्य शासनाने यास मान्यता देताना प्रत्येकी साडेतीन हजार कोटींची मदत देखील देऊ केली आहे.

उर्वरित सुमारे नऊ हजार कोटीचा निधी इक्विलिटीतून उभारण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग अस्तित्वात येणार आहे. नाशिक तालुक्यातील नानेगाव, संसरी, बेलतगव्हाणच्या शेतकर्‍यांनी या मार्गाचे भूसंपादनास विरोध दर्शविला असता खा. गोडसे व महारेलच्या अधिकार्‍यांनी शेतकरी हिताचाच प्रथम प्राधान्याने विचार केला जाईल, असे आश्वासित केल्याने काल सकाळी खा. गोडसे यांच्या हस्ते नानेगाव येथे श्रीफळ वाढवून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी सुनील आडके, अशोक आडके, ज्ञानेश्वर शिंदे, भगवान आडके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. याशिवाय देवळाली-वडगाव मार्गाचे देखील सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे कमीतकमी क्षेत्र बाधित होईल. तसेच अर्धवट शेतजमीनी अधिग्रहित न करता शेतकर्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे निर्णय घ्यावेत, अशा विशेष सूचना खा. गोडसे यांनी अधिकार्‍यांना केल्या जूनअखेर सर्वेक्षणचे काम पूर्ण झाल्यांनतर दोन्ही प्रस्ताव सादर करून शेतकरी हिताच्या मार्गाला प्राधान्य दिले जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com