
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. शहरातील एकूण १३ पोलीस ठाणे हद्दीतील १९ ठिकाणी कोबींग ऑपरेशन राबवून कारवाई करण्यात आली...
यात वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षकांसह शेकडो पोलीस सहभागी झाले होते. सोमवारी रात्री दोन वाजेपर्यंत हे ऑपरेशन सुरू होते. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण होण्यास मदत होणार आहे.
पोलिसांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर असे एकूण १५७ गुन्हेगार तपासले. तर एकूण ९० गुन्हेगार सापडले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या एकूण 36 आरोपींची देखील पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र ते मिळून आले नाहीत. त्यामुळे कारवाई प्रमाणे ते हद्दीबाहेर असल्याचे दिसून आले. तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२, ११७ प्रमाणे २९ टवाळखोर तसेच अजामिनपात्र वॉरंट मधील ११ लोकांवर करवाई करण्यात आली.
तसेच भारतीय हत्यार कायदयाचे उल्लंघन करणाऱ्या एका विरूध्द अंबड पोलीस ठाणे येथे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पोलीस उपआयुक्त, ४ सहा. पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणे प्रभारी, पोलीस ठाण्याचे ४२ पोलीस अधिकारी व २३६ पोलीस अंमलदार तसेच गुन्हेशाखा युनिट १ व २ प्रभारी अधिकारी तसेच गुन्हेशाखा युनिटचे अधिकारी व पोलीस अंमलदार अशांनी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता.
कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार तसेच समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यापुढेही पोलीस आयुक्तालय हद्दीत वेळोवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त.