करोनाची वाढती संख्या धोक्याची; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

करोनाची वाढती संख्या धोक्याची; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मालेगाव | प्रतिनिधी

कोरोनावर चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळविल्यानंतर पुन्हा रुग्णसंख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लग्नसमारंभावर नियंत्रण ठेवण्याबरोबर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज पोलीस प्रशासनास दिले आहेत...

मालेगाव महानगरपालिकेत आयोजित सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, पोलीस उपअधिक्षक प्रविण जाधव, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजित राजपूत, डॉ.हितेश महाले, डॉ.सपना ठाकरे यांच्यासह तक्रारदार रामदास बोरसे, महसूल, महानगरपालिका व भुमीअभिलेख विभागातील प्रमुख उपस्थित होते.

कोरोनावर मात करून मालेगाव शहराने नावलौकीक मिळवत मालेगाव पॅटर्न तयार केला आहे, मात्र गेल्या काही दिवसातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या चिंताजनक असून नागरिकांनी आरोग्य प्रशासनाच्या त्रिसुत्रीचा अंमल करावा.

सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येत गर्दी होईल असे समारंभ टाळण्यात यावे. लग्नसमारंभात शासनाच्या नियमानुसार अधिक गर्दी केल्यास आयोजकांसह मंगलकार्यालयाच्या मालकाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून याची सर्वांनी दखल घ्यावी.

सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी बरोबरच लसीकरणासाठी देखील आरोग्य प्रशासन झटत असून जिल्हाभरात जवळपास 35 हजार लसीकरण झाले आहे.

यामध्ये कुणालाही त्याचा विपरीत परिणाम झालेला नाही. लसीकरण हे पुर्णत: सुरक्षित असून लवकरच सर्वसामान्य नागरिकांच्या लसीकरणास सुरूवात होईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यावेळी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com