
नाशिक | Nashik
केंद्र शासनाच्या 'आयुष्यमान भव' मोहिमेचा (Ayushyaman Bhav Campaign) नाशिक जिल्ह्यात (Nashik District) आज (दि. १७) सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. या मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यात ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय येथे प्रत्येक शनिवारी आयुष्यमान मेळावा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी 'आयुष्यमान भव' मोहिमेत सहभागी होऊन आरोग्यविषयक सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांनी केले आहे...
यावेळी शर्मा म्हणाले की, 'आयुष्यमान भव' मोहिमेंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र येथून संदर्भित झालेल्या रुग्णांना विशेषज्ञांमार्फत औषधी उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. यासाठी १०२ व १०८ रुग्णवाहिकांचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे १७ सप्टेंबर ते ०२ आक्टोबर २०२३ या कालावधीत 'सेवा स्वच्छता पंधरवाडा' घेण्यात येणार असून यात सर्व शासकीय रुग्णालयांत स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.
तसेच ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchayat) आयुष्यमान सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत नागरिकांना आरोग्यविषयक सर्व योजनांची माहिती, आयुष्यमान गोल्डन कार्ड व आभाकार्ड याबद्दल माहिती देण्यात येणार असून लाभार्थ्यांचे कार्ड काढण्यात येणार आहे. तसेच वय वर्षे १८ व त्यावरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून मोफत उपचार करण्यात येणार आहे. यासोबतच ३० वर्ष वयावरील व्यक्तींची असंसर्गिक आजारांची तपासणी, उपचार व संदर्भसेवा प्रत्येक गावामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी व त्यांच्या पथकामार्फत करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे 'आयुष्यमान भव' मोहिमेंतर्गत ० ते १८ वयोगटातील सर्व बालकांचीही तपासणी, उपचार व संदर्भ सेवा पथक व समुदाय आरोग्य अधिकारी व त्यांच्या पथकांमार्फत करण्यात येणार आहे. 'टी.बी.मुक्त भारत' अंतर्गत संशयित क्षय रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येणार असून उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरविणाऱ्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी दिली.
दरम्यान, ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीतील सेवा पंधरवाडा सुरू झाला आहे. १७ ते ०२ ऑक्टोंबर या कालावधीत आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता मोहिम, रक्तदान शिबीर, अवयव दानाचे आवाहन असे कार्यक्रम होणार आहेत. १७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत वय वर्षे १८ वरील नागरिकांची आरोग्य तपासणी मोहिमचे आयोजन केले आहे. ०१ ते ०८ नोव्हेंबर आणि २५ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी केली जाणार आहे.
या आजारांवर मिळणार उपचार
जिल्हा रूग्णालय नाशिक, सामान्य रूग्णालय नाशिकसह जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालये आणि ग्रामीण रूग्णालयांत आयुष्यमान मेळावा हा १७ सप्टेंबर २०२३ पासून दर शनिवारी होणार असून या साप्ताहिक मेळाव्यात प्रामुख्याने स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसा, त्वचा रोग, मानसिक आजार, दंत शल्यचिकित्सक, टेलीकन्लटेशन सेवा इत्यादी तज्ञ यांच्यामार्फत आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहेत.