
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ या आर्थिक वर्षातील योजनानिहाय अर्थसंकल्पीय तरतूद सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना कळविण्यात आलेल्या आहेत. मंजुरी तरतुदीनुसार सर्व यंत्रणांनी विविध विकासकामांचे प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह प्रशासकीय मान्यतेसाठी त्वरीत सादर करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांना उपस्थित यंत्रणा अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector's office) मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/ आदिवासी उपयोजना/ अनुसूचित जाती उपयोजना) २०२२-२३ आणि २०२३-२४ अंतर्गत वितरित निधी, झालेला खर्च याबाबत यंत्रणानिहाय आढावा घेतला. ज्या कार्यान्वयीन यंत्रणांचे सन २०२२-२३ मधील खर्चांचे उपयोगिता प्रमाणपत्र प्रलंबित आहेत ते त्वरीत महालेखापाल यांना सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकरी जलज शर्मा यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
यासोबतच ऑगस्ट २०२३ अखेर झालेला खर्च, मागील अपुर्ण कामांचा देय निधी (स्पील) त्याचप्रमाणे सन २०२३-२४ मध्ये प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केलेले व करावयाचे प्रस्ताव यांचा आढावा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतला. तसेच प्राप्त निधी वेळेत खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजित कामांचे प्रस्तावांबाबत अनुषंगिक तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता वेळेत प्राप्त करून घेण्याच्या सूचनाही दिल्या.
दरम्यान, या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जून गुंडे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी जितिन रहमान, उप वनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, उप वनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, सहाय्यक नियोजन अधिकारी सुनिल सोनार यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.