नाशिक महानगरपालिकेकडून तब्बल 'इतक्या' लाख गणेश मुर्तींचे संकलन

नाशिक महानगरपालिकेकडून तब्बल 'इतक्या' लाख गणेश मुर्तींचे संकलन

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरीकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग रहावा याकरीता विविध उपक्रम राबविण्यात आले. नागरीकांनी त्याला प्रतिसाद देत उद्देश सफल केल्याचा निर्वाळा मनपा प्रशासनाद्वारे करण्यात आला.

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने तसेच नदीपात्रांचे जल प्रदुषण रोखण्यासाठी श्री मुर्ती दान करणे व निर्माल्य संकलित करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असून, गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवसाच्या श्री मुर्तींच्या विसर्जनाच्या अनुषंगाने नागरीकांनी गणेश मुर्ती दान करून व निर्माल्य कलशात जमा करून महानगरपालिकेस मोलाचे सहकार्य केल्याचे चित्र होते. नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सहा प्रशासकीय विभागातील कार्यक्षेत्रातील श्री विसर्जनाचे विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात गणेश मुर्ती संकलीत करण्यात आल्या.

यंदाच्या विसर्जनास्थळ व ठिकठिकाणच्या कृत्रीम तलावाद्वारे तब्बल २ लाख २५३ श्री मुर्तींचे संकलन करण्यात आले. तसेच, नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विसर्जन ठिकाणांहून एकूण १५३.१५५ मे.टन निर्माल्य संकलन करणेत आले. त्याच प्रमाणे मनपातर्फे नागरिकांना विसर्जनाकरिता ९५३.५ किलो अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे वाटपही करण्यात आले.

विभाग निहाय श्री मुर्ती संकलन संख्या

पंचवटी - ७७ हजार ३२९

नाशिकरोड- ४२ हजार ०९६

सातपूर- ३० हजार ३३०

नविन नाशिक- २४ हजार ६१६

ना.पुर्व- १४ हजार ७६५

ना.पश्चिम- ११ हजार ११७

यंदा शाडू मातीच्या मुर्तीला मोठी मागणी

मागील वर्षी एकूण २,०६,००० गणेश मूर्तिचे व १४४ टन निर्माल्य संकलन करण्यात आले होतें परंतु यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मनपाच्या प्रयत्नास शहरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणावर शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करून घरीच विसर्जन केले.

दरम्यान, पर्यावरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभाग यांचे परस्पर समन्वयाने कार्यवाही करणेत आली. श्री गणेश विसर्जन पर्यावरणपूरक साजरा करण्यात यावा याकरीता महानगरपालिकेस उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल शहरातील नागरीकांचे नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आभार व्यक्त करणेत येत आहे.

एनजीओंचा सहभाग

गणेश मूर्ती संकलन करनेकरिता मनपास विविध सामाजिक संस्थाचे सहकार्य लाभले त्यात संघर्ष करियर अकॅडमी, बिटको कॉलेज, एनसीसी कॅडेट्स, सह्याद्री प्रतिष्ठान, के व्ही. नाईक कॉलेज, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, के के वाघ अभियांत्रिकी कॉलेज, एनडीएमव्हिपी कॉलेज, संदीप फाऊंडेशन, महावीर पॉलीटेक्निक, स्वप्नपूर्ती फाऊंडेशन, रोटरी क्लब आदी संस्थाचा समावेश होता.

नगरसेवकांमध्येही उत्साह

सोमेश्वर धबधबा परिसरात नगरसेवक विलास शिंदे यांच्या माध्यमातून ५१ हजार मोदकांचे वाटप करण्यात आले. तर या ठिकाणी शिवसैनिकांच्या माध्यमातून नागरीकांना कृत्रीम तलावात श्रींच्या मुर्तीचे विसर्जन करण्यांसाठी प्रयत्न करण्यात येत होते.

सातपूर शिवाजी नगर स्टॉपवर नगरसेवक दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने नागरीकांद्वारे कृत्रीम तलावात विसर्जन करण्यात आले. तर अशोक नगर बसस्टॉप येथे शिवसेनेच्या माध्यमातून समाधान देवरे यांनी गणेश मुर्ती दान करणाऱ्या नागरीकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

तर, सातपूरचा प्रमुख विसर्जन स्थळ सातपूर अंबड लिंक रोड वरील नासर्डी पूलावर वाहतूक एक मार्गी करण्यात आली होती. याठिकाणी नगरसेवक सलिम शेख यांच्या सह पोलिस प्रशासन नागरीकांनी मोठ्या प्रमाणात नागरीकांना मुर्ती दान करण्याचे महत्व पटवून दिले. गोवर्धन गावालगतच्या विसर्जन स्तळावर ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लांबे यांच्या वतीने मोदक वाटप करण्यात आले.

नाशिकचा मानाचा गणपती

नाशिक महानगरपालिकेच्या मानाच्या श्री गणेशाची विधिवत पूजा करून मूर्तीचे दान करण्यात आले. नाशिक महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मंडळाचा मानाच्या श्री गणेशाचे गोदावरी नदी पात्रालगत विधिवत पूजा करून श्री गणेश मूर्तीचे दान करण्यात आले.

यावेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपायुक्त श्रीकांत पवार, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड,कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, सचिन जाधव,जितेंद्र पाटोळे, विभागीय अधिकारी योगेश रकटे,राजाराम जाधव,विभागीय स्वच्छता निरीक्षक दराडे, उपअभियंता प्रकाश निकम, रवींद्र घोडके, नवनीत भामरे, समीर रकटे, नितीन गंभीरे ,रवींद्र कलगुंडे, विशाल तांबोळी, तुषार देशमुख, रवींद्र घोडके अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com