करोना काळात २ कोटीची दंड वसुली

शहर वाहतुक पोलीस विभागाची कामगिरी
करोना काळात २ कोटीची दंड वसुली

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात तसेच शहरात करोनाचा उद्रेक झाल्याने सर्व विभागांना याचा फटका बसत आहे. मात्र शहर वाहतुक पोलीस विभागाने या करोना काळातही २५ मार्च ते ३० जुलै पर्यंत २ कोटी २२ हजारांचा दंड वसुल करण्याची कामगिरी केली आहे.

जगभरात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर २३ मार्च पासून राज्यासह नाशिक जिल्हा व शहरातही लॉकडाऊन करण्यात आले. पहिल्या लॉकडाऊनमध्ये सर्वत्र संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परिणामी सर्वत्र वाहतुक तसेच वाहने बंद होती. परंतु अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहने घेऊन फिरणारांवर शहर पोलीसांकडून कारवाई सूरू करण्यात आली होती.

या कालावधीपासून शहर वाहतुक पोलीसांनी विनाकारण फिरणारी नागरीकांची वाहने जप्त करण्यासह दंडात्मक कारवाई सुरू केली होती. यानंतर एप्रिलमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने याचा गैरफायदा घेत अनेक जण वाहने घेऊन बाहेर पडत होते. यामुळे अशा वाहनांवरील कारवाई वाढत गेली तर सध्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात सुट देण्यात आली असली तरी अद्यापही वाहतुक पोलीसांकडून कारवाई सुरू आहे.

यासह मागील तीन महिन्यांपासून संपुर्ण शहरातील नियमती वाहतुक चालू झाल्याने वाहतुकीचे नियम तोडणारे, ट्रिपलसीट, हेल्मेट, सीटबेल्ट न वापरणारे, सिग्नल तोडणारे तसेच विविध वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

वाहतुकीचा दंड रोख भरण्यावरून अनेकदा पोलीस कर्मचारी व नागरीकांमध्ये शाब्दीक चकमकी झडत असल्याने त्यावर ऑनलाईन दंडाची मात्रा पोलीसांनी शोधून काढली आहे. याचा अधिकाधीक वापर या लॉकडाऊन काळात करण्यात आला.

यामुळे २५ मार्च ते ३० जुलै पर्यंत २ कोटी २२ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. यातील २३ लाख ४६ हजार रूपये दंड रोख स्वरूपात दंड वसुल करण्यात आला. तर १ कोटी ७६ लाख ७६ हजार ४०० रूपयांची ऑनलाई दंड करण्यात आला असून तो सबंधीतांना एसएमस पाठवून ऑनलाईन वसुल करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com