मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
नाशिक

मुख्यमंत्री ठाकरे नाशिक दौऱ्यावर; चर्चेला उधाण

नाशिककरांमध्ये चर्चा

Kundan Rajput

नाशिक । Nashik

महाविकास आघाडीचे समन्वयक तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी आता घराबाहेर पडा हा सल्ला दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सिमोल्लंघन केले. पुण्यानंतर ते नाशिकचा दौरा करणार होते. पण अतिवृष्टीने त्यांच्या नाशिक दौर्‍यावर पाणी फेरले.

पुढील आठवड्यात ठाकरे नाशिकला येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून कळते. जिल्हा प्रशासन देखील कामाला लागले असल्याचे समजते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दौरा केल्यानंतर यंत्रणा गतिमान होईल व करोनाला अटोक्यात आणण्यासाठी आणखी प्रयत्न केले जातील, असे बोलले जात आहे.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा करत करोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर शरद पवार यांनी विविध जिल्ह्यांना भेटी देत परिस्थिती जाणून घेतली. त्यामुळे निदान आता तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ' 'मातोश्री' बाहेर पडावे अशी टिका होऊ लागली.

शरद पवार यांनी देखील ठाकरे यांनी बाहेर पडावे हा सल्ला दिला. तो ऐकत ठाकरे यांनी पुणे शहराला भेट देऊन करोनाचा आढावा घेत यंत्रणेला सूचना केल्या. त्यानंतर ते नाशिकचा दौरा करणार होते. जिल्हा प्रशासन देखील तयारीला लागले होते. पण बुधवारपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली.

रेकाॅर्डब्रेक पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. गंभीर परिस्थिती बघता मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाशिक दौरा रद्द केला. हवामान खात्याने रविवारपर्यंत (दि.९) अतिवृष्टिचा इशारा दिला आहे. ते बघता मुख्यमंत्री ठाकरे पुढील आठवड्यात नाशिकला येऊ शकतात असे बोलले जात आहे. नाशिककरांमध्ये ठाकरे यांच्या दौर्‍याबाबत चर्चा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com