मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राज्यभर राबविणार

पाणीसाठवण क्षमता वाढणार
मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राज्यभर राबविणार

नाशिक | Nashik

जुन्या जलस्त्रोतांच्या दुरुस्तीसह पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जबाबदारी मृद व जलसंधारण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. राज्यस्तरावर व आयुक्त स्तरावर प्रकल्प कार्यान्वयन कक्षाची स्थापना करून प्रकल्पाचे नियंत्रण केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सिंचनासह पाणीसाठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत राज्यातील सर्वच भागांत जलसाठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. विशेषत: दुष्काळ निवारण्यासाठी गेल्या ३० ते ४० वर्षांत रोजगार हमी योजना व इतर योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलस्त्रोत तयार करण्यात आले आहे. त्या माध्यमातून शेतीच्या संरक्षित सिंचनासह पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. पाणीपुरवठा योजनांनाही त्याचा मोठा फायदा झाला. मात्र, या जलस्त्रोतांची नियमित देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे.

अनेक प्रकल्पांना दुरुस्तीची गरज असून, त्याअभावी पाणी वाया जात आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्त्याखाली असलेल्या ६०० हेक्टरपर्यंतच्या सिंचन क्षमतेचे पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, सिंचन तलाव, लघुपाटबंधारे तलाव, साठवण बंधारे, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, माजी मालगुजारी तलाव, सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, वळवणीचे बंधारे आदी जलस्त्रोतांची दुरुस्ती या मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

दरम्यान, कालव्याच्या भरावाची व कालव्यावरील बांधकामाची तुटफूट झाली असून, दुरुस्तीअभावी सिंचनासाठी कालव्यातून जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. त्यामुळे या कालव्यांच्या दुरुस्तीची कामे घेण्यात येणार आहे. त्याद्वारे जलप्रकल्पांच्या सिंचन क्षमतेचा पुरेपूर वापर करणे शक्य होणार असल्याचा दावा मृद व जलसंधारण विभागाने केला आहे.

आठ हजार योजनांची दुरुस्ती

मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमांतर्गत मार्च २०२३ पर्यंत ६०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या राज्यातील ७,९१६ योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे ८ लाख ६ हजार ९८५ घनमीटर पाणीसाठा, तर १ लाख ६६ हजार १८४ हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित होईल. दुरुस्तीसाठी १३४०.७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com