मतदार यादीत नाव नाहीये, नावात बदल करायचा आहे? ही बातमी तुमच्यासाठी

मतदार यादीत नाव नाहीये, नावात बदल करायचा आहे? ही बातमी तुमच्यासाठी

नाशिक | प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगामार्फत छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यासंबंधीची प्रारुप मतदार यादी 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिध्द होणार आहे. या प्रारूप यादीची तपासणी करून त्याबाबत काही हरकती किंवा दुरूस्ती असल्यास त्यांची नोंदणी देखील नागरीक यावेळी करू शकणार आहेत.

याअनुषंगाने या विशेष मतदार नोंदणी मोहिमेत नागरीकांनी सक्रीय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

17 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणाऱ्या प्रारुप मतदार यादीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे, तहसिलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले की, नागरीकांना मतदार यादीतील बदलांसाठी आपल्या जवळच्या मतदार केंद्रावरांवर जावून नाव नोंदणी करता येईल.

त्याचप्रमाणे https://nvsp.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नागरिक अर्ज करू शकतात. यासंदर्भात अधिक माहितीसाठी https://nvsp.in/ किंवा https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच 1950 या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर विचारणा करू शकतात, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, ज्या मतदान केंद्रातील मतदार संख्या 1 हजार 500 पेक्षा अधिक आहे, अशा मतदार केंद्रांची जवळच्याच परिसरात विभागणी करण्यात आल्याने जिल्ह्यातील एकूण मतदार संघातील 4 हजार 446 मतदान केंद्रामध्ये 233 नवीन मतदान केंद्राची वाढ करण्यात आली आहे.

वाढविण्यात आलेल्या मतदार केंद्रामुळे वेळेत मतदान होवून मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. या मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत नागरीकांना मतदार यादीमध्ये नव्याने नाव समाविष्ट करणे, नावातील बदल, मयत आणि स्थलांतरीत मतदारांची माहिती अद्यावत करणे, तसेच मतदाराच्या तपशीलातील दुरूस्ती करण्याचे काम यामोहिमेद्वारे करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी देखील त्यांच्या राजकीय पक्षाच्या प्रतिनीधींची नेमणूक करुन प्रारुप मतदार यादीची तपासणी करण्यात यावी, जेणेकरून प्रारुप मतदार यादीमधील त्रुटींसह हरकती विहीत मुदतीत नोंदवून मतदार यादीच्या पुनरिक्षण मोहिमेचा लाभ नागरिकांना घेता येईल, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.

नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदार संघातील मतदार संख्या लक्षात घेता काही मतदार केंद्रांची पुर्नररचना करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचा विचार करून पहिल्या मजल्यावर असणारी सर्व मतदान केंद्र तळ मजल्यावर स्थलांतरीत करण्यात आल्याने ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना मतदान करतांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाहीत, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com