स्थगिती उठवल्याने रखडलेल्या कामांचा मार्ग मोकळा

स्थगिती उठवल्याने रखडलेल्या कामांचा मार्ग मोकळा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सन 2021-22 मध्ये मंजूर करण्यात आलेली मात्र, निविदा न काढलेली, कार्यारंभ आदेश न दिलेल्या 5 कोटी 66 लाख रुपयांच्या 63 कामांवरील स्थगिती पालकमंत्री दादा भुसे ( Guardian Minister Dada Bhuse )यांच्या सूचनेनंतर उठवण्यात आली आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishad Nashik ) माध्यमातून वर्षभरात रखडलेली रस्ते, समाज मंदिर व पाणीपुरवठ्याची कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ग्रामविकास विभागाने मार्च 2022 मध्ये लोकप्रतिनिधींना ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सुचविलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यात आदिवासी उपाययोजना आणि डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत कोट्यवधींचा निधी मंजूर केला होता. आ. नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे आदींच्या मतदारसंघातील कामे या निधीतून करण्यात येणार असल्याने यातील काही कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात यावीत, यासाठी अंदाजपत्रक करून संबंधित ठेकेदारांना कामांच्या शिफारशीही देण्यात आल्या होत्या. मात्र, या कामांचे कार्यारंभ आदेश बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून वेळेत दिले गेले नसल्याने कामे रद्द झाली होती.

लोकप्रतिनिधींनी स्थगिती उठवण्याची मागणी करत थेट अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. बांधकाम विभाग 1 चे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाला राजकीय रंग मिळाल्यानंतर कंकरेज यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच पालकमंत्री भुसे यांनी गेल्याच महिन्यात 118 कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेत विकास कामांचा मार्ग मोकळा करून दिला होता. त्यात डोंगरीच्या 63 कामांवरील स्थगिती मात्र कायम होती. नाशिक दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री भुसे यांनी या कामांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वर्षभरात रखडलेली रस्ते, समाज मंदिर व पाणीपुरवठ्याची कामे आता मार्गी लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com