मयत सफाई कामगारांचे वारस अद्यापही नियुक्तीपासून वंचित
नाशिक

मयत सफाई कामगारांचे वारस अद्यापही नियुक्तीपासून वंचित

कुटुंबासह बसले आमरण उपोषणला

Sanjay More

Sanjay More

नांदगाव । प्रतिनिधी

मागासवर्गीय मयत सफाई कर्मचारी यांच्या वारसांना तथा वारसाहक्काने नगरपालिकेत नियुक्ती मिळण्यासाठी जुने तहसील कार्यालया येथे गुरुवार (दि. १३) रोजी सहकुटुंब आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा वारसदार व त्यांच्या कुटुंबीय यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून सेवेत असतांना मयत झालेले आणि सेवानिवृत्त झालेले मागासवर्गीय कर्मचारी यांच्या वारसांना लाड कमिटीच्या शिफारशी नुसार सेवेत सामावून घेणे गरजेचे असतांना अद्यापही नियुक्ती दिलेल्या नसून वारंवार आश्वासन दिले जाते. नगर पालिकेत मागासवर्गीय सफाई कर्मचारी यांच्या ११ जागा रिक्त असून देखील नियुक्त्या दिल्या जात नाहीत.

सन २००२ मध्ये लाड कमिटीच्या शिफारशीनुसार दोन कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या त्यानंतर अद्याप पर्यंत गेल्या आठ वर्षांपासून एकाही वारसाला सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही.

यापूर्वी देखील सदर वारसांनी नाशिक येथे १४ ऑगस्ट २०१९ रोजी उपोषण केले असता त्यावेळेस जिल्हाधिकारी यांनी सांगितल्या प्रमाणे राज्य मागासवर्गीय सफाई कर्मचारी , मागासवर्गीय यांना वारसाहक्काने नियुक्त्या मिळत नाहीत व शासनाने याबाबत अनेक परिपत्रकांमध्ये दुरुस्त्या करणे बाकी असून याबाबत आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय वरळी, मुंबई यांच्याकडे मार्गदर्शन मागविले आहे.

मार्गदर्शन प्राप्त होताच त्यासंदर्भात नांदगाव नगरपालिकेस कळविण्यात येईल त्यानंतर उपोषण मागे घेतले होते. परंतु त्या नंतर अद्यापही कोणतेही उत्तर आम्हाला मिळालेले नाही. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून आमच्या कुटुंबाची उपासमार होत असून कोरोनाच्या संसर्गामुळे रोजगार व उदरनिर्वाहचे साधन राहिले नाही.

आम्ही अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असून आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही सर्व सहकुटुंब आमरण उपोषण गुरुवार (दि.१३) ऑगस्टपासून सुरू करणार आहोत असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर रणजित अहिरे, बापू भालेकर, प्रवीण ससाणे, पांडुरंग हिरे, सचिन गुढेकर, सुजित जगताप, दिगंबर गुढेकर, विकी पेवाल आदींच्या सह्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com