Photo Gallery : गांधीतलावासह गोदापात्राची स्वच्छता सुरु

उशीरा का होईना मनपा प्रशासनाला जाग
Photo Gallery : गांधीतलावासह गोदापात्राची स्वच्छता सुरु

नाशिक । Nashik

गोदाप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर उशीरा का होईना मनपा प्रशासनाला जाग आली असून गोदावरी पात्राची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. गांधी तलावातील गाळ काढल्यानंतर गोदापात्रातील घाण काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेकडून गोदा सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत अहिल्याबाई होळकर पूलाच्या पलीकडे नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम मागील तीन महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.

त्यामुळे गोदापात्र कोरडे पडले अाहे. या ठिकाणी प्रचंड घाण व कचरा साचला आहे. मातीच्या गाळामुळे या ठिकाणी रानगवत वाढले होते. तसेच इतर नदीपात्रात पाणी साचल्यामुळे सर्वत्र हिरवळयुक्त पाणी साचले होते. याबाबत गोदाप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याची दखल महापालिकेने घेत गोदा स्वच्छता मोहीम हाती घेतली.

गांधीतलावापासून स्वच्छता मोहीमेला प्रारंभ झाला. येथील गाळ, गवत, वाळू काढण्यात आली. त्यानंतर रामकुंड ते खंडोबा महाराज पटांगण स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी नदीपात्राची स्वच्छता होणे गरजेचे असते. नंतर चार महिने पावसाळा व धरणातून होणारा विसर्ग यामुळे सहा महिने नदीला पाणी असते. सध्या जेमतेम पाणीसाठा शिल्लक असल्याने धरणातून सोडण्यात येणारे पाणी अडविण्यात आले आहे.

‘राम तेरी गंगा मैली हाे गयी’, हे काही दशकांपूर्वी अजरामर झालेले हिंदी चित्रपटातील गीत आजही तंताेतंत खरे हाेत आहे.

गंगेचा उगम झालेल्या त्र्यंबकेश्वरपासूनच गंगेची अस्वच्छता कायम असून शहरातील गंगापूर, आनंदवली, रामकुंडपासून थेट निफाडपर्यंत ही नदी वर्षानुवर्षे कचरा, पाणवेली, शेवाळ, निर्माल्यात वास करत आहे. सध्या गाेदावरीची स्थिती विदारक झाली असून पात्रात शेवाळ, केरकचरा अाणि पाणवेलींचाच खच पाहायला मिळताे आहे.

पंचवटीतील गाेदाघाट, रामकुंड, आहिल्यादेवी हाेळकर पुलाखाली आजमितिस स्मार्टसिटीचे काम सुरु आहे. या कामामुळे गाेदेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. रामवाडी पुलाजवळील पात्रातून वाळूउपसा सुरु असून येथे युद्धपातळीवर काम सुरु आहे.

दरम्यान, रामवाडी पुलापासून हाेळकर पुलापर्यंत पात्रात पाणीच नसून येथून पुढे आणि मागे पात्रात पूर्णत: गाळ, शेवाळ आणि पाणवेली वाढली आहे. याप्रश्नावर कायमचा ताेडगा काढण्यासाठी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागासह, नदी बचाव संस्था, स्मार्टसिटी व्यवस्थापनाने एकत्रित काम करुन याेग्य उपाय याेजायला हवेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

स्मार्ट खाेळंबा

स्मार्ट सिटीच्या नावाने विविध भागात भुमिगत वायरिंग, पाणी पाईपलाइन टाकली जात आहे. माेठे खड्डे खणले गेले आहेत. यामुळे विविध ठिकाणची वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. साेबतच स्थानिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे स्मार्ट काम साेडाच, स्मार्ट खाेळंबा नक्कीच झाल्याचे नागरिक सांगत अाहेत.

गाेदाघाट, आहिल्यादेवी हाेळकर पुलाखाली स्मार्टसिचीच्या सुरु असलेल्या कामकाजामुळे प्रदूषण वाढले आहे. आता सध्या माती, भराव बाजूला केला जात आहे. येथील जुन्या वास्तूंना धक्का लागत आहे. यातून काेणता विकास हाेणार आहे. काेणत्याही पूर्वनियाेजनाशिवाय काम केले जात आहे. ते अयाेग्य आहे. सुरु असलेली स्वच्छता माेहीम नेहमी केली जावी असे वाटते.

- केवळ निमगावकर, स्थानिक तरुण.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com