नांदूरमध्यमेश्वर गोदावरी घाटावर स्वच्छता मोहीम

तरुणांच्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत
नांदूरमध्यमेश्वर गोदावरी घाटावर स्वच्छता मोहीम

निफाड । प्रतिनिधी

गोदावरी घाट परिसरातील असलेली अस्वच्छता, रक्षा विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांचे जुनाट कपडे, देवतांच्या मूर्ती, अर्धवट जळालेली लाकडे यामुळे या परिसरास आलेले बकालपण दूर करत नांदूरमध्यमेश्वरच्या तरुणांनी स्वयंस्फूर्तीने हा परिसर स्वच्छ केला. तसेच किरण आमणकर या तरुणाने संपूर्ण गावात जंतुनाशक औषधांची फवारणी करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.

महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून नांदूरमध्यमेश्वरची ओळख आहे. मात्र सध्या करोना प्रादुर्भावामुळे येथील गोदावरी घाटावर व परिसरात घाणीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले होते. बाहेरील गावातून दररोजचे येथे होणारे रक्षा विसर्जन कार्यक्रमामुळे घाणीच्या साम्राज्यात वाढ होत होती. परिणामी गावातील तरुणांनी आपली कैफियत राष्ट्रवादीचे प्रांतीक सदस्य हरिश्चंद्र भवर यांच्या कानावर घातली. साहजिकच त्यांनी लागलीच जेसीबी बोलावले.

परिणामी गावातील तरुण सोमनाथ इकडे, सचिन वाघ, किरण आमणकर, सोयेब शेख, गजेंद्र पुजारी, बापू कहाणे, सुमित शिंदे, सोपान वाघ, शुभम शिंदे, संजय माळी, दीपक माळी, गोरख माळी, गोपीचंद शिंदे, नयन जोशी, शरद इकडे आदींनी एकत्र येत गोदावरी नदीचा घाट गाठला. प्रथम जेसीबीच्या सहाय्याने या परिसरातील काटेरी झुडपे एकत्र करून ती पेटवून देण्यात आली. त्यानंतर नदीकाठावर खड्डा खोदत त्यात नदीकाठावर असलेल्या मूर्तींचे विधिवत पूजन करून त्यांचे विसर्जन करण्यात आले. तसेच बाहेरगावाहून येणार्‍या रक्षा विसर्जनासाठी एका खोल खड्ड्याची निर्मिती करण्यात आली.

जेणेकरून रक्षा व अस्थी विसर्जन नदीपात्रात न करता ते या खड्ड्यात टाकावे. जेणेकरून नदीचे पाणी दूषित होणार नाही. तसेच दशक्रिया विधीनिमित्त आलेल्या महिलांना कपडे बदलण्यासाठी येथे पत्रे लावून व्यवस्था केली जाणार आहे. या ग्रुपमधील तरुण किरण आमणकर हा गावात विनामोबदला जंतुनाशक औषधांची फवारणी करत आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवत तरुणांनी राबवलेल्या या उपक्रमाचे गावातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com