पाचवी ते नववीचे वर्ग पुन्हा Online

पाचवी ते नववीचे वर्ग पुन्हा Online

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

नाशिक महानगर पालिका क्षेत्रात काेराेना नियंत्रणात आल्याने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते.

मात्र फेब्रुवारीत पुन्हा रुग्ण वाढू लागल्यामुळे शहरातील अकरावीसह पाचवी ते नववीचे वर्ग १३ दिवसासाठी बंद करण्यात आले असून या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे.

शहरातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सध्या केवळ दहावी व बारावीचे वर्ग सुरू असून त्यासाठीही विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांची संमती अनिवार्य आहे.

शाळेतून काेराेना पसरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका क्षेत्रातील २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्यात आले. नाशिक शहरात महापालिका व खासगी शाळा मिळून जवळपास पाचवी ते आठवीचे १ लाख १० हजार ७७३ विद्यार्थी असून २ हजार ६०२ शिक्षकांमार्फत दिवसाआड ५० टक्के उपस्थितीत शाळा सुरू झाल्या होत्या.

नाशिक महापालिकेच्या १०२ शाळा असून ३०३ खासगी शाळा आहेत. यामध्ये महापालिका शिक्षकांची संख्या ४७५ असून खासगी शाळेत २,१२७ शिक्षक आहेत.

दरम्यान, वरील मनपा शाळांमध्ये ५ वी ते ८ वीचे १५,४७६ विद्यार्थी असून खासगी शाळांत ९५,२९७ विद्यार्थी आहेत.

क्लासेसचे वर्ग बंद

शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर खासगी कोचिंग क्लासेसबाबत काय निर्णय होणार याबाबत उत्सूकता निर्माण झाली होती.

परंतु, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेतर्फे महापालिका आयुक्तांंच्या निर्णयाप्रमाणेच पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे क्लासही बंद केले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com