नाशिकरोडला कोयते, तलवारी बरसल्या; दोन जखमी, वाहनांची तोडफोड

नाशिकरोडला कोयते, तलवारी बरसल्या; दोन जखमी, वाहनांची तोडफोड

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड (Nashikroad) व उपनगर (Upnagar) पोलीस स्टेशनच्या हद्दीत तलवारी व कोयतेधारी गॅंगचा धुमाकूळ सुरूच आहे. नाशिकरोड परिसरातील सामनगाव रोडवरील अश्विनी कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत तलवारी, कोयते, चाकू आदी शस्त्रांचा सर्रास वापर करण्यात आला...

या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून त्यात एका महिलेचा समावेश आहे त्याचप्रमाणे शस्त्रधारी टोळक्याने दहशत निर्माण करण्यासाठी रस्त्यावरून येणाऱ्या वाहनावर हल्ले करित तोडफोड केली. दरम्यान या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात परस्पराविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आले आहेत.

अंकुश शांताराम जाधव (रा. माढा बिल्डिंग, अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, जयप्रकाश नगर) याचा मित्र कुणाल विष्णू सूर्यवंशी हा त्याचा मित्र नरेश शिंदे याच्या घरून आपल्या घरी जात असताना संशयित आरोपी निकेश जाधव, जितेश जाधव, शुभम कोतवाल, योगेश अहिरे आदींनी त्याला रस्त्यात अडविले.

त्यानंतर मागील भांडणाची कुरापत काढून कुणालच्या पोटावर सुरुवातीला चॉपरने वार करून तलवार व कोयत्याने हातावर डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी अंकुश जाधव यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दुसरी तक्रार प्रवीण महादेव महाडिक (रा. जयप्रकाश नगर, अश्विनी कॉलनी, नाशिक रोड) यांनी केली आहे. संशयित अतिश उर्फ शांताराम चौधरी, अंकुश चौधरी, गणेश शर्मा आदींनी प्रवीण महाडिक यांच्या घरात हातात कोयते व शस्त्र घेऊन घुसले. यावेळी प्रवीणची आई शकुंतला महाडिक ह्या घरी असताना तुझा मुलगा कुठे आहे त्याच्या मित्रांनी आमचा मित्र कुणाल याला मारहाण केली आहे, असे बोलून घरातील सामानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.

तसेच शकुंतला महाडिक यांच्यावरही कोयत्याने हल्ला केला. जखमी झालेल्या शकुंतला महाडिक ह्यांची मुलगी पूजा ही उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना या तिघा संशयितांनी पूजा हिस सुद्धा शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच शुभम कोतवाल व जितेश जाधव यांच्या घरावर हल्ला करून नुकसान केले.

यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका स्कूल व्हॅन बसवरही संशयतांनी हल्ला करून बसची काच फोडली. त्याचप्रमाणे लाजरस तांबे यांची पार्किंगमध्ये असलेल्या मोटर सायकलची तोडफोड करून नुकसान करून दहशत निर्माण केली.

या प्रकारानंतर टोळके हे फरार झाले. याप्रकरणी प्रवीण महाडिक यांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली गणेश नायदे, पोलीस उपनिरीक्षक काकड, हवालदार रामदास गायकवाड पुढील तपास करत आहे.

दरम्यान या प्रकारामुळे सामनगाव रोड परिसरात घबराट निर्माण झाली असून सातत्याने होणाऱ्या या प्रकारामुळे रहिवाशी हैराण झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com