नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा रूग्णालयात 120 अग्निप्रतिबंधक बंब असून सर्वांची मुदत मार्च 2021 पर्यंत आहे. यासह सर्व इलेक्ट्रीक साधने, वायरींग व्यवस्थित असून रूग्णालय आगीबाबत पुर्णतः सुरक्षित असल्याचा दावा आरोग्य प्रशासनाने केला आहे.

भंडारा येथे जिल्हा रूग्णालयात आग लागून 10 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. यामध्ये शासकीय रूग्णालयांच्या कारभारावर चौफेर टिका होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रूग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे व त्यांच्या पथकाने जिल्हा रूग्णालयातील अग्निप्रतिबंधक यंत्रणेची पाहणी केली.

यावेळी आढळलेल्या काही तृटी तात्काळ दूर करण्याचे आदेश त्यांनी कर्मचार्यांना दिले. यासह तेथील कर्मचार्यांशी संवाद साधत तातंत्रिक अडचणी, इलेक्ट्रीक साधनांचा सुरक्षित वापर याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत खैरनार व इतर कर्मचारी होते.

तत्पुर्वीच विद्युत विभागाच्या पथकांनी रूग्णालयातील इलेक्ट्रक साधणे, वायरींग यांची पाहणी केली. यामध्ये सर्व सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा रूग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात सध्या 30 बालके उपचार घेत आहेत. दोन वर्षांपुर्वी या विभागात बालकांचे मृत्यूचे प्रमाण वाढल्यानंतर तेव्हापासून या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात असून चोवीस तास कर्मचारी कार्यरत असतात असे डॉ. रावखंडे यांनी सांगीतले.

दरम्यान, भंडारा येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रूग्णालयात राज्यस्तरीय समिती, अग्निशामक दल यांनी पाहणी केल्याचा अफवा सोशल माध्यमांमध्ये पसरल्या होत्या.

या खोट्या असून अग्निप्रतिबंधक साधनांची नियमित तपासणी केली जाते. परंतु भंडाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपणच ही तपासणी आज केल्याचे डॉ. रावखंडे यांनी सांगीतले.

ऑडिट मागवले जिल्हा रूग्णालयाचे दरवर्षी अग्निप्रतिबंधक ऑडीट केले जाते. रूग्णालयात 120 साधने असून त्यांची मुदत मार्च 2021 आहे. यानंतर पुन्हा ऑडीट होणार आहे. सतर्कता म्हणुन आपण आज पाहणी केली असून खात्री करून घेतली आहे. तसेच यापुर्वीचे ऑडीट रिपोर्ट आपण मागवले आहेत. याचा अभ्यास आम्ही करून अग्निप्रतिबंधक अधिक काही करता येईल का याचा प्रयत्न करू. सध्या तरी जिल्हा रूग्णालय अग्निबाबत सुरक्षित आहे.
डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक