नागरी सुविधा समितीचा आंदोलनाचा ईशारा

नागरी सुविधा समितीचा आंदोलनाचा ईशारा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरातून वाहणार्‍या मोसम नदीपात्राच्या ( Mosam River )स्वच्छतेबाबत मनपा प्रशासनाची उदासीनता कायम असल्याने नदीपात्राचे गटारगंगेत रूपांतर झाले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यास्तव नदीपात्राची तत्काळ स्वच्छता करावी, अन्यथा येत्या 10 तारखेस मनपा प्रशासनास साडी-चोळीची ओवाळणी देऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा सार्वजनिक नागरी सुविधा समितीने ( Nagari Suvidha Samiti )दिला आहे.

याबाबत नागरी सुविधा समिती अध्यक्ष रामदास बोरसे, भरत पाटील, भालचंद्र खैरनार, कैलास शर्मा, दीपक पाटील, नीलेश पाटील आदींच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मोसम पात्राच्या स्वच्छतेसह नागरी सुविधांच्या प्रलंबित मागण्यांसाठी समितीतर्फे गेल्या महिन्यात प्रभाग एक कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले होते.

मोसम नदीपात्रात अमृत योजनेंतर्गत होत असलेल्या कामासाठी तोडफोड करून नदीचा प्रवाह बदलण्यात आल्याने नदीचे पाणी वाहत नाही. परिणामी रक्तमिश्रीत पाणी, मेलेली कुत्री, सांडपाणी व इतर स्वरुपाची घाण नदीपात्रात साचली असून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नदीपात्र डास उत्पादन केंद्रच बनले असून डासांच्या प्रादुर्भावाने साथीचे आजार बळावले असून विशेषत: लहान मुले व ज्येष्ठांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. मनपातर्फे ठराविक भागात फवारणी केली जाते. परंतु औषधाचे प्रमाण अतिशय किरकोळ असते. त्यामुळे डासांचे निर्मूलन होत नाही. या संदर्भात मनपातर्फे उपाययोजना केली जात नसल्याबद्दल समितीने निवेदनात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मोसम नदीस महापूर येतो तेव्हा महापुराचे पाणी ओसरण्यासाठी सुवासिनी महिला साडी-चोळीचा आहेर देऊन नदीची आरती करतात व पूर ओसरण्यासाठी साकडे घालतात. या प्रथेनुसार मनपा प्रशासनास साडी-चोळीचा आहेर मिळाल्यानंतरच मोसम नदीची स्वच्छता होईल का? असा सवाल करत नदीपात्राची तत्काळ स्वच्छता न झाल्यास येत्या 10 मे रोजी 21 मीटरची साडी व चोळीचा आहेर देऊन ओवाळणी करण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com