सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

एसटी महामंडळाला केंद्र आणि राज्य सरकारने आर्थिक मदत देऊन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात अशी मागणी सीटूच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल कराड यांनी केली आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे बस वाहक अनिल चौधरी यांनी वेतन मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते. एसटी महामंडळाच्या गेल्या अनेक महिन्यापासून कर्मचार्यांना वेळेवर वेतन मिळत नाही अशी तक्रार आहे.

महामंडळातील सर्व संघटनांनी या अनियमितेकडे महामंडळाचे व राज्य सरकारचे वेळोवेळी लक्ष वेधले आहे. परंतु त्याची वेळीच दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे.

महाविकास आघाडी सरकारला हे शोभणारे नाही अनिल चौधरी यांच्या आत्महत्येस महामंडळातील बेजबाबदार अधिकारी व गैर कारभार जबाबदार आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सीटूच्या वतीने करण्यात आली आहे.

राज्य परिवहन ही सार्वजनिक सेवा आहे. जगात कुठल्याही सार्वजनिक सेवा नफ्यात चालू शकत नाही. मूलभूत सुविधा पुरवणे ही सरकारांची जबाबदारी आहे.

बहुतेक सर्व देशांत सार्वजनिक सेवांवर सरकार प्रमुख्याने खर्च करते, परंतु खाजगीकरणाचे धोरण आल्यापासून केंद्र व राज्य सरकारने सार्वजनिक सेवांवर खर्च करण्यास आखडता हात घेतला आहे व त्यामुळेही महामंडळे तोट्यात येत आहेत .

राज्य परिवहन महामंडळाला केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनी ही मदत करणे आवश्यक आहे. अनिल चौधरी यांच्या आत्महत्येस केंद्र आणि राज्य सरकारचे खाजगीकरणाचे धोरण ही जबाबदार असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाला तातडीने आर्थिक मदत करावी. व कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात अशी आग्रही मागणी, सीटू करीत असल्याचे उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड व सरचिटणीस एम.एच. शेख यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.