
निफाड। प्रतिनिधी | Niphad
निफाड (niphad) येथील प्रांत व तहसील कार्यालयाचे (Tahasil Office) स्थलांतर झाल्याने नागरिकांना शासकीय कार्यालयात ये-जा करण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याने या कार्यालयाजवळ सर्व बसगाड्यांना थांबा (bus stop) देण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.
निफाड (niphad) हे तालुक्याचे ठिकाण असून ते मध्यवर्ती शहर म्हणून परिचित आहे. येथील तहसिल, प्रांत आदी शासकीय कार्यालये हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होते. मात्र नव्याने सुरू झालेले कार्यालय हे शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर नाशिक (nashik) रस्त्यावर शासकीय विश्रामगृहाजवळ हलविण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात कामासाठी नियमित यावे लागते.
मात्र शहरापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंंत सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी येथे सर्व बसगाड्यांना विनंती थांबा देण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पाण्याची व्यवस्था व्हावी निफाड तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय येथे शासकीय कामकाजा निमित्ताने तालुक्यातील नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. काही अपरिहार्य कारणास्तव नागरिकांना दिवसभर तिष्ठत रहावे लागते. मात्र पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांची कुचंबना होते. तरी येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
- शंकर वाघ, भाजप नेते (निफाड)