अस्वच्छता,माश्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अस्वच्छता,माश्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

पावसाळा ( Rainy Season )म्हणजे आल्हाददायक सरी, वाफाळत्या चहासोबत खमंग भजी, मित्रांसोबत मनसोक्त भिजण्याची धमाल आणि वर्षा सहलीचा आनंद. मात्र या गोष्टी विरहित पिंपळगाव बसवंत येथील महादेववाडी येथील नागरिकांच्या घराघरात घोंगावणार्‍या माश्या वाढल्या आहे.

कारण या परिसरात पोळ्या बनवणार्‍या कंपनीनेचे असुरक्षित गोडाऊन, पोल्ट्री व्यवसायिकाचा निष्काळजीपणा आणि बेदाणे व्यवसायाचा हलगर्जीपणा यामुळे या घाणीवर बसणार्‍या लाखोंच्या संख्येने माश्या निर्माण झाल्या असून या परिसरात राहणार्‍या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.चेतन काळे, योगेश धनवटे, मंजुषा पांडे, कांता घटकर, एस.डी. बागुल, दीपक चव्हाण, ग्रा.पं. सदस्य सुरेश गायकवाड, ग्रा.पं. कर्मचारी राकेश देशमुख यांनी या परिसराची पाहणी करून संबंधित व्यावसायिकांना पोळ्यांचे गोडाऊन काढून घेण्यासाठी सूचना केल्या असून गोडाऊन न काढल्यास कारवाईचे आदेश दिले आहे.

येथील महादेववाडी परिसरात औद्योगिक वसाहत असून तेथे विदेशात पोळ्या पाठविणार्‍या सिग्राम कंपनीने टाकाऊ असलेल्या खराब पोळ्या बारदान लावलेल्या शेडमध्ये ठेवल्याने माश्यांचे प्रमाण वाढले आहे. याच ठिकाणी पोल्ट्री असून मेलेल्या कोंबड्या शोषखड्डयात फेकल्या जात आहे. त्यामुळे त्यांची दुर्गंधी निर्माण होऊन घाणीचे साम्राज्य तयार झाल्याने माशांचा प्रादूर्भाव वाढत आहे.

या वस्तीजवळच बेदाणा शेड असून तेथे शेकडो बेदाणे भरलेल्या गोण्या सडून त्याची दुर्गंधी निर्माण झाल्याने तेथेही घाणीचे साम्राज्य वाढून माशांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरात राहणार्‍या नागरिकांना या माशांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाढती दुर्गंधी आणि माश्यांचा प्रादूर्भाव यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून येथील नागरिकांना नानाविध साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने या परिसराची पाहणी केली असता वरील भयावह दृश्य समोर आल्याने येथील पोळ्या बनविण्याचे शेड, बेदाणा शेड व पोल्ट्री हटविण्याचे निर्देश देण्यात आले असून सदरची कार्यवाही ही तत्काळ न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य विभाग व पिंपळगाव ग्रामपालिकेने संबंधितांना दिले आहेत.

अशी घ्यावी काळजी

माश्यांचा उपद्रव टाळण्यासाठी घराभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. घरातील खाद्यपदार्थ नीट झाकून ठेवावे. जाळीपासून तयार केलेले माश्या मारण्याचे साधन वापरून माश्या माराव्यात. डिंकासारखा चिकट पदार्थ लावून तयार केलेला कागद ठिकठिकाणी ठेवल्यास त्याला माश्या चिकटतात. नंतर या कागदाचा नाश करता येतो. व्यवसायिकांनी स्वच्छता राखण्याची दक्षता घ्यावी. कीटकनाशके वापरून माश्यांच्या अंड्यांवर व डिंभांचा नाश करावा. कीटकनाशकांचा फवारा मारून जमिनीवर किंवा भिंतीवर बसलेल्या माश्यांचा नाश करावा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com