वैद्यकीय सुविधांअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात

आरोग्यसेवेकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
वैद्यकीय सुविधांअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दिंडोरी | संदीप गुंजाळ Dindori

करोनापासून ( Corona ) आरोग्याच्या सोयी (Health facilities) मुबलक असायला हवी याची जाणीव प्रत्येक नागरिकाला झाली. पण दिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka ) लोकप्रतिनिधींना जाणीव झाली की नाही यावर जरा शासंकता उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण एकीकडे केंद्रीय आरोग्यमंत्री तर दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्ष असतांनाच दिंडोरी तालुक्यातील आरोग्यसेवा तुटपुंजीच आहे याची प्रचिती पुन्हा एकदा दोन दिवसांपूर्वी मुळाणेबारी घाटात झालेल्या ट्रॅक्टर अपघातावरून आली.

अपघातातील अपघातग्रस्तांना मिळालेल्या अपुर्‍या सोयी व गैरहजर कर्मचार्‍यांमुळे वणी ग्रामीण रूग्णालयातील भोंगळ कारभाराचे दर्शन पुन्हा घडले आहे. या भोंगळ कारभाराला कोणी वाली आहे की नाही ? केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नातून दिंडोरी तालुक्यात मुबलक आरोग्यसेवा मिळणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे.

दोन दिवसांपूर्वी मुळाणेबारी घाटात झालेल्या अपघाताने अवघ्या जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. मजुरी करणार्‍या काळाचा घाला आला आणि सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. जवळपास 15 जण जखमी झाले. त्या जखमींना उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गैरहजर कर्मचारी व अपुर्‍या सोयीमुळे अपघातग्रस्तांना उपचार मिळण्यासाठी अडचण तयार झाली. वणी येथील खासगी वैद्यकीय अधिकार्‍यांनी मदतीचा हात देत जखमींना ग्रामीण रूग्णालयात येवून एक सामाजिक बांधिलकी जपली. नक्कीच हे कौतुकास्पद आहे. परंतु ग्रामीण रूग्णालयातील भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.

आरोग्य सेवेसाठी किती दिवस झगडत रहायचे. दिंडोरीच्या खासदार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री झाल्या तर आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षपदी मजल मारली हे नक्कीच तालुक्यासाठी भुषणावह आहे. परंतु तालुका आजही आरोग्यासाठी सक्षम नाही यापेक्षा दुर्दैव दुसरे असूच शकत नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

प्रशासनाकडून वारंवार सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. मुळाणेबारी अपघातावेळी वणी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा तोकडी पडली. परंतु खाजगी डॉक्टरांच्या मदतीमुळे काही प्रमाणात वेळ निभावून नेता आली हे किती वेळेस करायचे .लोक प्रतिनिधींकडून याची दखल घेतली पाहीजे. वणी ग्रामीण रुग्णालय हे परिसरातील जनतेसाठी खुप महत्वाचे आहे.

येथील प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा पुर्ण डळमळीत झाली आहे. दिंडोरी तालुक्यातून एका बाजूला सप्तशृंगी गडावर जाणारे भाविक व सापुताराला जाणारे पर्यटक तर दुसर्‍या बाजूने गुजरात महामार्ग असल्याने रहदारीचे प्रमाण जास्तच आहे. अपघात झाला तर पाहिजे त्या सुविधा वेळेवर मिळत नाही. जिल्हा रूग्णालयात पोहचेपर्यंत उशीर होतो. वेळेवर पाहिजे त्या सुविधा मिळाले नाही तर अपघातग्रस्तांना आपला जीव गमवावा लागतो.

दिंडोरी तालुका हा गोरगरीबांचा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. बहुतेक रुग्ण खाजगी रुग्णालयाऐवजी सरकारी रुग्णालयांचा प्रामुख्याने जास्त वापर करतात. त्यासाठी दिंडोरी रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर होण्याची मागणी गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी आतातरी बोध घेत मागणी पुर्णत्वासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वणी रुग्णालयाचा भोंगळ कारभार

दिंडोरी-वणी येथील शासकीय रुग्णालयात दिंडोरी, सुरगाणा, कळवण, पेठ, चांदवड तालुक्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात मात्र येथील सुविधांच्या वानवा कायम असून वारंवार मागणी होऊनही येथील कारभारात सुधारणा होत नाही. अपुर्‍या सेवा सुविधांच्या कमरतेने रुग्णांची हेळसांड होत असून त्याचा प्रत्यय गुरुवारी मुळाणे घाटात झालेल्या अपघातानंतर आला. एकच डॉक्टर व अपुर्‍या आरोग्य कर्मचार्‍यांच्या अन् सुविधांच्या अभावात खासगी डॉक्टर मदतीला धावून आले. येथील कारभार कधी सुधारणार अन् सेवासुविधा कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. वणी परिसरात आपघाताचे प्रमाण जास्त असून आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे. दि. 2 जुन रोजी घडलेल्या घटनेच्या दिवशी ही एकच डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात होते. सायंकाळची वेळ असल्याने अनेक आरोग्य कर्मचारी ही नव्हते. एवढ्या मोठ्या आपघातात ग्रामस्थ व खाजगी डॉक्टरांनी तातडीने इलाज करत जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविले. काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयात वीज कनेक्शन बंद केल्याने झालेली अडचण निर्माण झाली होती. आपत्कालीन वेळेस वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे.

झिरवाळांकडून मदतीची अपेक्षा

पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरीतचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणार्‍या कुटुंबावर काळाचा घाला आला. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. शासनाकडून या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत असतांनाच प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. सर्वसामान्यांच्या जीवाला काहीच मोल नसते काय? अशी म्हणण्याची वेळ आली असून विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळांनी यात पुढाकार घेऊन अपघातग्रस्तांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे.

उपजिल्हा रुग्णालय प्रलंबितच

दिंडोरी लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची अवघ्या राज्यभर चर्चा आहे. दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. भारती पवार यांची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदापर्यंत वर्णी लागली तर विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून आमदार नरहरी झिरवाळांची वर्णी लागली हे नक्कीच दिंडोरीचे भाग्य. दोन्ही लोकप्रतिनिधींची सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळख आहे. त्यामुळे साधारण 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दिंडोरी ग्रामीण रूग्णालयाचे लवकरच उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर होणेकामी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व विधानसभा उपाध्यक्ष दखल घेवून मतदारसंघाला न्याय देतील अशी अपेक्षा दिंडोरी तालुक्यातील जनता व्यक्त करीत आहेत . वणी येथील अपघातात मिळालेल्या अपुर्या सोयी लक्षात घेता तात्काळ आरोग्य सेवा मुबलक मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधी काय प्रयत्न करतात? याकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com