नांदगाव। Nandgaon (प्रतिनिधी)

नांदगाव शहरा लगत असलेल्या मध्य रेल्वेगेट जवळ (११४) अंडरपासचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याने येत्या दि. १० जानेवारी पर्यंत दिवसरात्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

याचा फटका या मार्गावरुन जाणाऱ्या असंख्य वाहन धारकांना बसणार आहे. तब्बल अकरा दिवस रेल्वेगेट असल्याने शहरातील वाहतूकीचा खोळंबा होणार आहे. नांदगावकरांना मोठ्या अडचणींचा सामना यावेळी करावा लागत आहे.

मध्य रेल्वेने प्रवासी गाड्यांचा वेग वाढविणे तसेच तिसऱ्या लोहमार्गाचे काम हाती घेतले असल्याने लोहमार्गावरील सर्व रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत नांदगाव शहरातील रेल्वे गेट बंद करून रहदारीसाठी अंडरपास तयार केला आहे.

या अंडरपासचे काम अंतिम टप्यात आले आहे. अपूर्ण असलेल्या कामांपैकी काही काम रेल्वे फाटक परिसरात असल्याने काम करण्यासाठी गुरुवार दि. ३१ डिसेंबर ते दि. १० जानेवारी सकाळी दहा वाजेपासून पुढील अकरा दिवसांसाठी गेट बंद केले आहे.

रेल्वे गेट बंद झाल्याने चारचाकी वाहनांना उड्डाणपुलावरून जावे लागत असल्याने पाच किलोमीटरचा अतिरिक्त फेरा पडत आहे. तर दुचाकी वाहनधारकांना जुन्या लेंडी पुलाखालून जावे यावे लागत आहे. हा पूल अरुंद आणि कमी उंचीचा असल्याने पूल ओलांडताना बराच वेळ खोळंबून राहावे लागत असल्याने वेळेचा अपव्यय होत आहे.

अंडरपासचे काम अंतिम टप्प्यात आल्याने तो लवकरच रहदारीसाठी खुला होणार आहे परंतु अंडरपासला जोडणारा रस्ता तीव्र उताराचा आणि काटकोनात असल्याने वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना येथून माग काढताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

येथून दररोज वीस हजार नांदगावकर येजा करत असल्याने आमदार कांदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकित नगरपरिषदेने अंडरपासच्या समोरील अडथळा ठरणाऱ्या मटण मार्केटची जागा उपलब्ध करुन देऊ असे सांगितले होते.

नगरपरिषदेच्या या निर्णयाविरोधात मटण मार्केटमधील गाळेधारकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याने न्यायालयाचा निर्णयाकडे नांदगावकरांचे लक्ष लागले आहे.