
वाजगाव | वार्ताहर | Vajgaon
वाजगाव (ता.देवळा) येथे रविवारी दुपारच्या सुमारास वाजगाव-देवनदी रस्त्यावर असलेल्या आव्हळे शिवारातील सोमनाथ महाले (Somnath Mahale) यांच्या घराचे भरदिवसा कुलूप तोडून कपाटातील १२ हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी पळवली आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी विठोबा महाले यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता ; पण हाती काही न लागल्याने चोरट्यांनी कपाटातील सर्व कपडे व साड्या घरभर पसरवून ठेवल्या होत्या.
त्यानंतर डिसेंबर महिन्यात शरद महाले (Sharad Mahale) यांच्या घरी याप्रमाणेच चोरीचा प्रयत्न केला गेला, यातही किरकोळ रक्कम व कपाटातील आधार, मतदान व पॅन कार्ड असलेली पिशवी चोरांनी लंपास केली होती.
याच घटनांची पुनरावृत्ती होत रविवारी यापूर्वी चोरी झालेल्या घरांच्या १०० मीटर अंतरावर असलेले सोमनाथ महाले यांच्या घराचे कुलूप (lock) तोडून चोरीचा प्रकार घडला.
महाले यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व वैद्यकीय उपचारासाठी हात उसनवारी करून १० हजार आणले व २ हजार मजुरीचे अशी एकूण १२ हजार रुपयांची रोख रक्कम कपाटात ठेवुन ते धोडंबे येथे एका कार्यक्रमात सहकुटुंब गेले असल्याचे चोरांनी लक्षात घेवून दुपारच्या वेळी संधी साधत मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून कपाटातील रोकड रक्कम पळवली.
परिसरात अशापद्धतीने भरदिवसा चोरी (theft) होत असल्याने स्थानीक नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.