
नाशिक । प्रतिनिधी Nashik
महापालिका ( NMC)क्षेत्रासह लगतच्या गावांना बससेवेशी जोडणार्या सिटीलिंकने प्रवाशांच्या मागणीवरून नाशिक-कसारा बससेवा ( Nashik- Kasara Bus Services)सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून कसार्यापर्यंत बससेवा चालवण्यासाठी परवानगी मिळण्याकरता सिटीलिंकद्वारे ( CITILINK)राज्य परिवहन महामंडळाकडे पत्र पाठवण्यात येत आहे.
महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून ‘सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक’ शहर बससेवेचा जुलै 2021 पासून शुभारंभ करण्यात आला. टप्प्याटप्प्याने बससेची संख्या वाढवण्यात आली. एसटी महामंडळाच्या संपाच्या पार्श्वभूमीवर व महापालिका क्षेत्रात बससेवेला वाढता प्रतिसाद लक्षात घेता लगतच्या 20 किलोमीटर परिघाच्या क्षेत्रातील ओझर, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पिंपळगाव, वाडीवर्हे, चांदोरी आदी ग्रामीण भागातही बससेवा सुरू करण्यात आली आहे.
अलीकडेच कसारा लोकल कनेक्शनच्या माध्यमातून नाशिकहून कसारा लोकलने मुंबईकडे जाणार्या लोकांची संख्या लक्षात घेता नाशिक-कसारा बससेवा सुरू करण्याची तयारी सिटीलिंकने केली आहे. त्यासाठी सिटीलिंकने राज्य परिवहन महामंडळाकडे महापालिका हद्दीपासून 60 किलोमीटरपर्यंत बससेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे पत्रही दिले आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
नाशिक संदर्भात निर्णय घेतल्यास तोच निर्णय राज्यातील इतर शहरांसाठीदेखील लागू करावा लागणार असल्याने शासनपातळीवर या मागणीचा विचार सुरू आहे. तूर्त नाशिक-कसारा बससेवेला तरी परवानगी मिळावी, यासाठी सिटीलिंकने राज्य परिवहन महामंडळाला विशेष पत्राद्वारे विनंती केली आहे. सिटीलिंक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके यांनी या वृत्तास दुजोरा दिला.