
नाशिक | Nashik
कालपासून नाशिक शहराची प्रमुख वाहतुकीची सुविधा असलेल्या सिटीलिंक (Citilinc) बसच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ठेकेदाराने वाहकांना दोन महिन्यांचे वेतन न दिल्याने सिटीलिंकच्या वाहकांनी कामबंद आंदोलन पुकारले असून आज सलग दुसऱ्या दिवशीही सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे...
काल दिवसभर सिटीलिंक व्यवस्थापन आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन देखील त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा चालक आणि वाहकांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाचा नाशिककरांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत असून रिक्षा व भाडोत्री वाहन चालक जादा भाडे आकारून प्रवाशांची लुट करतांना दिसून येत आहे.
दरम्यान, वर्षभरापूर्वी नाशिक शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून सिटीलिंक बससेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र पगार वेळेवर मिळत नसल्याने गेल्या पाच सहा महिन्यांपासून सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने कामबंद आंदोलने केली जात आहेत. त्यानंतर कालपासून सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा कामबंद आंदोलन (Protest) पुकारण्यात आल्याने विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत.