नाशिक | Nashik

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. साहित्य रसिकांना संमेलनासाठी आर्थिक मदत करता यावी यासाठी चित्ररथ तयार केला जात असून, तो नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये फिरविण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला आहे.

साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी किमान साडेतीन कोटींच्या निधीची आवश्यकता भासेल, असा अंदाज आहे. मात्र, संमेलनाला देशभरातून मोठ्या संख्येने साहित्य रसिक येण्याची शक्यता असून, त्यामुळे अधिक निधीदेखील लागण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने ५० लाख, तर आमदारांनी त्यांच्या निधीतून एक कोटी ४५ लाखांचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. सुमारे दोन कोटींचा निधी या माध्यमातून जमा होत असला, तरी आणखी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासणार आहे.

उद्योजक, व्यापारी, विविध संघटना आणि संस्थांनी निधी देऊन संमेलन आयोजनात योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही केले आहे. सामान्य नागरिकांचीही त्यांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे निधी देण्याची इच्छा असू शकते.

त्यामुळे अशा साहित्य रसिकांसाठी 'निधी संकलन चित्ररथ’ तयार करून तो शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी फिरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.