
चिंचखेड । वार्ताहर Chinchkhed
दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील आरोग्य उपकेंद्र अनेकदा कुलूप बंद राहत असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या पाचवी वर्गातील विद्यार्थी सर्वेश मातेरे शाळेत असताना चक्कर येऊन पडला. शिक्षकांनी तत्काळ त्याला चिंचखेड येथील आरोग्य उपकेंद्रात नेले असता येथील आरोग्य केंद्राला चक्क कुलूप लागल्याचे दिसले.
विद्यार्थ्यांची तब्येत जास्तच खालावत असल्याने शिक्षकांनी त्वरित खासगी दवाखान्यात विद्यार्थ्याला उपचारासाठी दाखल केले. यापूर्वी देखील या उपकेंद्राबद्दल आणि ग्रामस्थांच्या तक्रारी येत होत्या. चिंचखेड येथील आरोग्य उपकेंद्र अनेकदा कुलूपबंद अवस्थेत दिसते. त्यामुळे येथील नागरिकांना खासगी हॉस्पिटलचा सहारा घ्यावा लागतो.
अनेकदा आरोग्य उपकेंद्र कर्मचार्यांना याबद्दल विचारले असता नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आरोग्य केंद्राच्या कर्मचार्यांच्या मनमानी कारभाराचा चिंचखेड येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित विभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने बघून त्वरित या कर्मचार्यांना समज द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चिंचखेड येथील आरोग्य उपकेंद्र अनेकदा का बंद असते, अशी विचारणा केली असता संबंधित कर्मचार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. चिंचखेड आरोग्य केंद्र कर्मचार्यांच्या मनमानी कारभारावर वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालून आळा घालावा. नावालाच असलेले उपकेंद्र नुसते वार्यावरच न ठेवता नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्याकरिता चालू ठेवावे.
शिवानंद संधान-संचालक-विविध कार्यकारी सोसायटी, चिंचखेड