चिमुकल्यांनी केली पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी

चिमुकल्यांनी केली पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी

निफाड | प्रतिनिधी | Niphad

रंगपंचमी (Rangpanchami) म्हणजे बच्चे कंपनीला एक पर्वणीच. नैसर्गिक रंगांची उधळण करीत पर्यावरणपूरक व आनंददायी रंगपंचमी उत्सव साजरा करण्याचा संकल्प निफाड (Niphad) येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी (Students) केला...

रंगपंचमीनिमित्त बाजारपेठा विविध पिचकार्‍या व रासायनिक रंगांनी सजल्या होत्या. रासायनिक रंगांमुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शिक्षक गोरख सानप यांनी नैसर्गिक रंग (color) तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करून भाज्या, फळे, फुले यापासून रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले. यात हळदीपासून पिवळा, पालकाच्या भाजीपासून हिरवा, टरबूजापासून लाल, गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलाबी, झेंडूपासून केशरी, बीटापासून जांभळा असे विविध रंग तयार करून दाखविले.

नैसर्गिक कोरड्या रंगांचा वापर करून सण आणि चित्रकला यांचा मेळ साधत विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांचे चेहरे आकर्षक पद्धतीने रंगविले. तसेच किरण खैरनार यांनी रासायनिक रंगांमुळे त्वचेवर ( Skin) होणार्‍या दुष्परिणामांची माहिती दिली. तर संजय जाधव यांनी रंगपंचमी खेळताना कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती दिली. रासायनिक रंगांनी रंगपंचमीच्या सणात रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून नैसर्गिक रंगांची कोरडी रंगपंचमी हाच सणाचा मुख्य उद्देश झाला पाहिजे.

दरम्यान, पालेभाज्या, फळे, फुलांपासून तयार झालेल्या नैसर्गिक रंगांनीच पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणार्‍या या उपक्रमाचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळ निफाड संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष वि.दा. व्यवहारे, संस्थेचे विश्वस्त अ‍ॅड.आप्पासाहेब उगावकर, सचिव रतन वडघुले, किरण कापसे, राजेंद्र राठी, अ‍ॅड.दिलीप वाघावकर, राजेश सोनी, प्रभाकर कुयटे, मधुकर राऊत, विश्वास कराड, नरेंद्र नांदे, गटशिक्षणाधिकारी प्रिती पवार, विस्तार अधिकारी कैलास बोरसे, मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे, केंद्रप्रमुख निलेश शिंदे व पालकांनी कौतुक केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com