करोन‍ाच्या तिसर्‍या लाटेत बालकांना धोक्याची शक्यता अधिक

पालकमंत्री छगन भुजबळ : नियोजन करावे
करोन‍ाच्या तिसर्‍या लाटेत बालकांना धोक्याची शक्यता अधिक

नाशिक । प्रतिनिधी

करोनाची दुसऱ्या लाटेमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर यांचा पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.

अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्या अनुषंगाने लहान मुलांच्या उपाचारासाठी स्वंतत्र कक्ष तयार करण्यात येवून त्याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच वाढत्या रुग्ण संख्येच्या नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये करेाना निर्बंध पाळण्यासाठी समुपदेशन व प्रबोधन करून योगदान द्यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या

करोना आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांसह लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जि.प. अध्यक्षा डाॅ.लीना बनसोड, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय आदींसह यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, करोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात आवश्यक सर्व प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करून त्या कायमस्वरूपी उपलब्ध करण्यावर भर देवून मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्ह्यात २९ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केंद्र सुरू करण्यात येत आहेत. ज्यामुळे भविष्यातील ऑक्सिजनची गरज पूर्ण करणे शक्य होणार आहे. तसेच आदिवासी भागातील नागरिक ज्या डॉक्टर व तेथील स्थानिक औषोधोपचार करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवून आजारपणात इलाज करतात, अशा डॉक्टर्स व स्थानिक लोकांची बैठक घेवून त्यांना कोरोनाच्या लढाईत सहभागी करून घेण्यात यावे, जेणे करून त्यांच्यामार्फत आदिवासी भागातील नागरिकांमध्ये कोरोना आजाराच्या उपचार विषयी जागृती होवून आदिवासी भागातील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मदत होईल.१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी ऑनलाईन नावनोंदणी करतांना काही तांत्रिक अडचणी येत असल्याने राज्य शासनाने लसीकरणाच्या नाव नोंदणीसाठी नवीन प्रणाली विकसित करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला अाहे. गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या स्थिर होती. परंतू ती पुन्हा नव्याने वाढू नये यासाठी लागू करण्यात आलेले कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस यंत्रणेने कारवाई करावी. पोलिसांच्या सहकार्याशिवाय लागू करण्यात आलेले निर्बंध यशस्वी होणार नसल्याने पोलिसांची भुमिका या काळात अत्यंत महत्वाची आहे असे भुजबळ यांनी सांगितले.

आरोग्य सुविधांच्या बळकटीवरणावर भर दया: कृषिमंत्री भुसे

करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सर्व शासकीय रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात यावे. जेणेकरुन येणाऱ्या तिसऱ्या लाटेला सामोरे जातांना अडचणी निर्माण होणार नाही. शहराला लागून असलेल्या तालुक्यात रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, नियमबाह्य लग्न सोहळे यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी पोलीस विभागाला बैठकीत दिल्या.

लसीकरणासाठी आदिवासी भागात जनजागृती : नरहरी झिरवाळ

जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यामंध्ये आदिवासी समाज कोरोनावरील उपचार व लसीकरणासाठी पुढे येत नूसन त्यांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवाना कोरोना आजाराचे गांभीर्य व लसीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बैठकीत सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com