प्रशासन शेतकर्‍यांच्या तक्रारी ऐकणार

प्रशासन शेतकर्‍यांच्या तक्रारी ऐकणार

दिंडोरी | प्रतिनिधी

जिल्ह्यातून जाणाऱ्या चेन्नई - सुरत महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीसाठी अत्यल्प मोबदल्याच्या विरोधात शेतकरी एकवटले असताना सदर संपादित जमिनीच्या सर्वेक्षणात बागायती जिरायती जमीन व वृक्ष नुकसान मूल्यांकन बाबत शेतकरी आक्रमक झाले आहे.

शेतकर्‍यांच्या मागण्या समजून घेण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरीत बैठक घेत शेतकर्‍यांच्या तक्रारी जाणून घेत त्या सोडवत फेर सर्वेक्षण करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला दिल्या आहे. समृध्दी महामार्ग प्रमाणे भूसंपादन मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

चेन्नई - सुरत महामार्गाची जमीन संपादित करताना शेतकरी मालकांना कोणत्याही सूचना न देता वस्तुनिष्ठ पंचनामा न करता प्रशासनाने सर्वेक्षण केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला. बागायती जमिनी असताना त्या जिरायती दाखवल्या, फळबागा व फळझाडे यांचे अत्यंत कमी मूल्यांकन केले गेले. रस्ता होत असताना सर्व्हिस रोड शेतकर्‍यांची दोन बाजूला विभागनारी जमीन याचा कोणताही विचार केला गेलेला नाही. शेतीचा मोबदला अत्यल्प दिला जात असल्याने शेतकरी संतप्त आहे. त्यांनी योग्य मोबदला व फेर सर्वेक्षण योग्य मूल्यांकन होवून फेर सर्वेक्षण न झाल्यास जमिनी न देण्याची भूमिका घेतली.

दरम्यान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सर्व शेतकर्‍यांच्या तक्रारी घेत त्याचे निरसन करून फेर सर्वेक्षण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी शेतकर्‍यांनी तीन दिवसात लेखी तक्रारी प्रांत कार्यालयात कराव्या त्याचे निरसन करून योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी तहसीलदार पंकज पवार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती सदाशिव शेळके, बाजार समिती उपसभापती कैलास मवाळ, विश्वासराव देशमुख, राजेश खांदवे, आर. के. खांदवे आदींसह शेतकरी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com