लेखा परीक्षण विभागाची तपासणी; करोना रुग्णांचे वाचले साडेचार कोटी

लेखा परीक्षण विभागाची तपासणी; करोना रुग्णांचे वाचले साडेचार कोटी

नाशिक । Nashik

शहरातील खासगी रुग्णालयातून करोना रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा जादा बिलांची आकारणी केली जात असल्याचे समोर येत आहे.

यासंदर्भातील येणार्‍या तक्रारीनंतर दखल घेतली जात आहे. यातच मनपाच्या लेखा परीक्षण विभागाकडून खासगी 86 कोविड रुग्णालयातील देयके तपासण्याचे काम सुरु आहे. या तपासणीत सुमारे साडेचार कोटी रुपयांची अवाजवी बिलांची आकारणी कमी करण्याचे काम लेखापरिक्षणातून करण्यात आले आहे. ही रक्कम रुग्णांच्या बिलांतून कमी केली असल्याची माहिती मुख्य लेखापरीक्षक बी. जे. सोनकांबळे यांनी दिली.

नाशिक महानगरपालिकेच्यावतीने खासगी कोविड रुग्णालयाकडून रुग्णांना आकारण्यात येणार्‍या अवाजवी देयकांची(बिलांची) तपासणी करण्यासाठी जानेवारी 2021 पासून 86 कोविड रूग्णालयात लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 8 एप्रिल 2021 पर्यंत ज्या 42,708 रुग्णांना खासगी रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

त्यापैकी संबंधित मनपा नियुक्त लेखापरीक्षकांनी 16,802 इतकी देयकांची तपासणी करून 04 कोटी 30 लाख 15 हजार 872 रुपये इतकी रक्कम ही खासगी रुग्णालयांकडून अवाजवी आकारली होती. ती रक्कम देयकातून कमी करण्यात आलेली आहे. उर्वरित 25,906 ही मेडिक्लेमची देयके होती.

जानेवारी 2021 ते दि. 08 एप्रिल2021 पर्यंत ज्या 11631 रूग्णांना खासगी रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यापैकी संबंधित मनपा नियुक्त लेखापरीक्षकांनी 3193 इतकी देयकांची तपासणी करून 64 लाख 18 हजार 927 रुपये इतकी रक्कम ही खासगी रुग्णालयांकडून अवाजवी आकारली होती.

ती रक्कम देयकातून कमी करण्यात आलेली आहे. उर्वरित 8438 ही मेडिक्लेमची देयके होती. अशी माहिती मुख्य लेखापरीक्षक सोनकांबळे यांनी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com